लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना पोलिसांनी कापसी पुलाजवळ सरकारी तांदूळ भरलेला ट्रक शुक्रवारी रात्री ताब्यात घेतला होता. त्यामुळे धान्य तस्करामध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी या धान्य तस्करीच्या गोरखधंद्याचा भंडाफोड करण्यासाठी डीसीपी सुहास बावचे यांच्या निर्देशावर भंडारा रोडवरील सावळी व कळमना येथील दोन धान्याचे गोदाम सील केले. अद्यापतरी गोदामात ठेवलेल्या धान्याची पोती आपली असल्याचा दावा कुठल्याच व्यापाऱ्यांनी केला नाही.डीसीपी बावचे यांना ट्रक क्र. एमएच-३५-के-३६५९ यात सरकारी धान्य भरून तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त सूचना मिळाली होती. या सूचनेच्या आधारे पोलिसांनी कापसी फ्लायओव्हरवर या ट्रकला थांबविले. त्यात रेशन दुकानातील तांदळाचे पोते मिळाले. ट्रक चालक अनिल गुडेकर व क्लिनर प्रल्हाद गुडेकर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. दोघांनाही शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसाचा पीसीआर सुनावला. यांच्याकडून धान्याच्या तस्करीत सक्रिय असलेल्यांचा खुलासा होऊ शकतो, असे पोलिसांचे सांगणे आहे. शुक्रवारी रात्री विचारपूस केली असता, आरोपींनी सांगितले की कळमना नाका नंबर चारवर गोदामातून तांदळाचा ट्रक लोड केला होता. त्याचबरोबर मौदा येथील सावळीच्या गोदामातून धान्याची पोती लोड केली होती. हा माल गोंदियाला जात होता. परंतु त्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला. सूत्रांच्या मते पोलिसांनी तपासात या गोदामामध्ये शुक्रवारी सकाळी तांदळाची पोती आणणाऱ्या ट्रकचे नंबर मिळाले आहे. हे ट्रक कुठल्या सरकारी गोदामातून आले होते याची माहिती मिळाली आहे. काळाबाजाराचा सूत्रधार कोण?हा तांदूळ गोंदियातील एका अग्रवाल नावाच्या व्यापाºयाच्या गोदामात पोहचविण्यात येत होता. हा तांदूळ रेशन दुकान व शालेय पोषण आहार योजनेंतर्गत वाटप करण्यासाठी होता. परंतु त्याचा काळाबाजार करून खासगी व्यापाऱ्यांना विकण्यात येत होता. या धान्याच्या काळाबाजाराचा मुख्य सूत्रधार कोण? या प्रकरणी पोलीस गांभीर्याने चौकशी करीत आहे. तीन वर्षापूर्वी लोकमतने केला होता खुलासासरकारी धान्याचा काळाबाजार कळमना येथील एका गोदामातून होत असल्याचा खुलासा तीन वर्षापूर्वी लोकमतने केला होता. यानंतर सरकारी विभागातील अधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. यानंतर काही राजकीय पक्षाशी जुळलेले लोक हे प्रकरण दाबण्यासाठी सक्रिय झाले होते.