तीन जबर जखमी : यशोधरानगरात प्रचंड तणाव नागपूर : शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटाकडून लाठ्या, काठ्या चालल्या. दगडफेक झाली. वाहने जाळली. एकाने चाकूही चालवला. त्यात तिघांना जबर दुखापत झाली. आरोपी विनाकारण दहशत निर्माण करीत असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठ्या चालवून त्यांना हुसकावून लावले. या भागातील तरुणांच्या दोन गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास दोन गटातील तरुणांनी एकमेकांना कट मारला. त्यावरून वादाला तोंड फुटले. त्यानंतर दोन्ही गटातील १५ ते २० आरोपींना लाठ्या काठ्या, चाकू, काचेच्या बाटला घेऊन धर्मराज विद्यालयाजवळ एकमेकांवर हल्ला चढवला. यात तिघांना जबर दुखापत झाली. आरोपींनी परिसरातील सहा वाहनांची जाळपोळ केली. शिवीगाळ दगडफेकीमुळे या भागात प्रचंड दहशत निर्माण झाली. रात्री ११ पर्यंत प्रचंड तणाव होता. माहिती कळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी दोन्ही गटांना हुसकावण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद देत आरोपींना हुसकावून लावले. त्यानंतर पवन प्रेमदासजी कानतोडे (वय २२) रा. पाहुणे ले-आऊट, पिवळी नदी (कामठी रोड) यशोधरानगर याच्या तक्रारीवरून एका गटातील दिनेश शेंडे, आकाश कांबळे, आतीश दशरथ शेंडे, बादल कांबळे, भूजन पाली, रोशन पाली, सोनू भट्टी (सर्व रा. माँ बम्लेश्वरीनगर) तर, आकाश प्रकाश कांबळे (वय २६) याच्या तक्रारीवरून पारुल गजभिये, जितेद्र विकास रोकडे, धम्मदीप ईश्वर लोखंडे, अतुल वानखेडे, निखील शाम भोयर, रजत राजेश खोब्रागडे आणि पवन प्रेमदासजी कानतोडे यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी) दुसऱ्या दिवशीही तणाव या हाणामारीच्या घटनेत पवन कानतोडे, शाहू आणि आकाश कांबळे या तिघांशिवाय अन्य काही जण जखमी झाले. मात्र, पोलिसांकडून त्यांची नावे स्पष्ट झाली नाही. या घटनेमुळे आज दुसऱ्या दिवशीही परिसरात तणावाचे वातावरण होते.
दोन गटात जोरदार हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2016 2:25 AM