नागपूर : विधीमंडळ अधिवेशन तोंडावर असताना नागपुरात विनयभंगाच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २४ तासांत विनयभंगाच्या दोन घटना समोर आल्या. कपिलनगर, प्रतापनगर व हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.
पहिली घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अभिजित ऊर्फ काली दीपक ठाकूर (२२, कपिलनगर) याची १९ वर्षीय मुलीशी ओळख होती. त्यांच्यात मैत्रीदेखील होती. त्याच्याशी भांडण झाल्याने तिने बोलणे बंद केले होते. यामुळे अभिजित व्यथित झाला होता. तो वारंवार तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. ती मैत्रिणीसोबत दुचाकीने महाविद्यालयात जात असताना त्याने तिला जबरदस्तीने थांबविले. तू बोलली नाहीस तर तुझ्या भावाला ठार मारेन, अशी त्याने धमकी दिली. त्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने या प्रकाराची माहिती घरच्यांना दिली. तिने कपिलनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अभिजितविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ३६ वर्षीय महिला एका कंपनीत कामाला असून त्याच कंपनीतील सुरक्षा अधिकारी धनराज लक्ष्मणराव चौधरी (४२, पिपळा हुडकेश्वर) याने तिचा विनयभंग केला. नोकरीवर राहायचे असेल तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असा दबाव त्याने बनविला. तसेच तिचा विनयभंग केला. महिलेने नकार दिला असता त्याने तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. तिने काही परिचितांना आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हिंगणा पोलिस ठाण्यात चौधरीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.
ट्यूशन क्लासमध्ये मुलीची काढली छेड
प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुभम निळकंठ चिचोने (२३, गोंडवाना सोसायटी, मनिषनगर) याने एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. गुरुवारी सकाळी सव्वासात वाजता ती कोचिंग क्लासला जात होती. शुभमची तिच्याशी ओळख होती. काही दिवसांपासून ती त्याच्याशी बोलत नव्हती. शुभम तिच्या क्लाससमोर गेला व बोलत का नाही, अशी विचारणा केली. तिचा हात पकडून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुभमला अटक केली.