नागपूर : येथील गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर बुधवारी दोन भिकाऱ्यांचा बेवारस मृत्यू झाला. विशेष म्हणजे ते कोरोना संक्रमित होते. या घटनेनंतर आता बसस्थानकावर रात्रीच्या विश्रांतीसाठी येणाऱ्या लोकांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी बसस्थानकावरील असलेल्या एका फलाटवर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळली. यासंदर्भात गणेशपेठ पोलिसांत सूचना दिल्यानंतर पोलिसांनी प्रेत नले. याच दिवशी एक अनोळखी वृद्ध महिला भिकारीही मरणासन्न अवस्थेत आढळली. पोलिसांत सूचना दिल्यावर मनपा कर्मचाऱ्यांनी तिला उपचारासाठी नेले. मात्र, ती दगावली. हे दोघेही कोरोना संक्रमित होते, अशी माहिती आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या घटनेनंतर संपूर्ण बसस्थानक आणि तो फलाट धुवून सॅनिटाइज करण्यात आला.
बसस्थानक हे सार्वजनिक ठिकाण असल्याने येथे अनेक बेवारस व्यक्ती, भिकारी, रात्री मुक्कामी असतात. मात्र, कोरोना संक्रमणाच्या काळात दोघांचा मृत्यू झाल्याने आगर प्रमुखांनी आता विशेष काळजी घेणे सुरू केले आहे. येथे रात्रीच्या विश्रांतीला येणाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.