लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बोगस आयकर रिटर्नच्या माध्यमातून २ कोटी ३५ लाख रुपयांचे हाऊसिंग लोन घेऊन इंडियन ओव्हरसीज बँकेची (आयओबी) फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे तत्कालीन वरिष्ठ व्यवस्थापक सुरेश भांडारकर आणि तत्कालीन सहायक व्यवस्थापक प्रणाली बगले यांना अटक केली. या अटकेमुळे बँक अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. इमामवाडा पोलिसांनी २३ एप्रिल रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.बैद्यनाथ चौकात इंडियन ओव्हरसीज बँकेची हनुमाननगर शाखा आहे. बँकेने शुभगृह हाऊसिंग लोन योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत आरोपींनी बँकेत हाऊसिंग लोनसाठी अर्ज करून क्षमतेपेक्षा अधिक लोन घेतले होते. बँकेत बोगस आयकर रिटर्न आणि इतर दस्तऐवज सादर केले. सात अर्जांच्या माध्यमातून बँकेने २ कोटी ३५ लाख रुपयांचे हाऊसिंग लोन मंजूर केले होते. जुलै २०१५ ते एप्रिल २०१६ दरम्यान हा घोटाळा झाला. आरोपींमध्ये शबीना अरशद खान, अरशद हसन खान, रा. पंचशीलनगर, वसीम अहमद जमील अहमद खान, वकील जमील अहमद खान, राणी वसीम अहमद खान, रा. यादवनगर, संगीता इटनकर, जयंत धर्मराज इटनकर, रा. पार्वतीनगर, योगेश वांढरे, रा. शेषनगर, शेख गुफरान अली, अफसर आजम अली रा. सिंदीबन कॉलनी आणि रेहाना इस्माईल शेख रा. अजनी यांचा समावेश होता; नंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने मो. अफसर आजम, जयंत इटनकर, त्याची पत्नी संगीता आणि योगेश वांढरे यांना अटक केली होती.पोलीस तपासात बँकेचे तत्कालीन सहायक व्यवस्थापक गोपीचंद खांडेकर, वरिष्ठ व्यवस्थापक सुरेश भांडारकर आणि सहायक व्यवस्थापक प्रणाली बगले यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे आढळून आले. त्यांनी दस्तऐवजांची तपासणी न करता आरोपींना कर्ज उपलब्ध करून दिले. आर्थिक गुन्हे शाखेने खांडेकरला अटक केली होती. सुरेश भांडारकर आणि प्रणाली बगले हे आपली अटक टाळण्यासाठी न्यायालयात गेले होते. परंतु तिथूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली.
नागपुरात आयओबीच्या दोन तत्कालीन अधिकाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 1:18 AM
बोगस आयकर रिटर्नच्या माध्यमातून २ कोटी ३५ लाख रुपयांचे हाऊसिंग लोन घेऊन इंडियन ओव्हरसीज बँकेची (आयओबी) फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे तत्कालीन वरिष्ठ व्यवस्थापक सुरेश भांडारकर आणि तत्कालीन सहायक व्यवस्थापक प्रणाली बगले यांना अटक केली. या अटकेमुळे बँक अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. इमामवाडा पोलिसांनी २३ एप्रिल रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : २.३५ कोटींचे हाऊसिंग लोन अपहार प्रकरण