नागपूर : अवघ्या २४ तासात दोन हत्या आणि पोलिसासह तिघांच्या हत्येचा प्रयत्न झाला. विविध भागात घडलेल्या या घटनांमुळे उपराजधानीत गुन्हेगारी उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काल शुक्रवारी एकाच दिवशी हत्येच्या दोन थरारक घटना घडल्या. सकाळी १०.१५ च्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तडीपार गुंडाची त्याच्या प्रतिस्पर्धी गुंडांनी हत्या केली. त्याची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच एमआयडीसीत एसआरपीएफच्या एका निवृत्त कर्मचारी महिलेचीही हत्या झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, एमआयडीसीत गुरुवारी पहाटे एका तरुणाच्या हत्येचा प्रयत्न झाला. गुरुवारी सायंकाळी एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला तर शुक्रवारी सकाळी नंदनवनमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावरही एका गुंडाने घातक शस्त्राचे घाव घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या रक्तरंजित घटनांमुळे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
एमआयडीसीएमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसआरपीएफ कॅम्पच्या मागे सप्तक नगर आहे. येथे विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) राहात होत्या. विजयाबाई एसआरपीएफच्या मेस मध्ये कार्यरत होत्या. निवृत्ती नंतर त्या स्वतःच्या घरात सप्तक नगरात राहायला गेल्या. त्यांचा मुलगा अमोल एसआरपीएफ मध्ये सेवारत असून तो वेगळा राहतो. त्यांना दोन विवाहित मुली सुद्धा आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी १२.३० ते १च्या सुमारास मोलकरीण त्यांच्याकडे कामाला गेली असता विजयाबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. तिने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नंतर एमआयडीसी पोलिसांना कळविले. माहिती कळताच ठाणेदार युवराज हांडे तसेच एमआयडीसी पोलीसचा ताफा, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके आणि पोलिस आयुक्त अमितेशकुमार घटनास्थळी पोचले. एकट्या राहणाऱ्या वृद्ध विजयाबाई यांची हत्या कोणी आणि का केली असावी, ते वृत्त लिहिस्तोवर उघड झाले नव्हते. मात्र लूटमारीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलीस अधिकारी वर्तवित आहेत. रात्री उशिरा ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ञ तसेच श्वानपथक बोलून घेतले. श्वान आजूबाजूच्या भागात घुटमळले. त्यातून पोलिसांच्या हाती ठोस असे काही मिळाले नाही.कोतवालीही घटना उघड होण्यापूर्वी पूर्व वैमनस्यातून गुंडाच्या एका टोळीने कुख्यात गुंड शानु उर्फ शहानवाज नासिर खान याची निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सकाळी १०. १५ च्या सुमारास गांधी गेट महाल भागात ही थरारक घटना घडली. शानु हा कुख्यात गुंड होता. त्याच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएसह विविध कारवाईदेखील केली होती. त्याला महिनाभरापूर्वी तडीपारही करण्यात आले होते.तीन वर्षांपूर्वी त्याने कुख्यात प्रवीण घाटे वर प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हापासून घाटे टोळीसोबत त्याचे वैमनस्य आले होते. शानुचा गेम करण्यासाठी ते संधी शोधत होते. या पार्श्वभूमीवर, ईद साजरी करण्यासाठी शानू घरी परतला तो आज सकाळी दुचाकीने जात दिसताच त्याच्या मागावर असलेले सौरभ घाटे आणि त्याच्या टोळीतील राजा उर्फ अर्शद शेख याने पाठलाग करून त्याला गांधी गेट जवळ गाठले आणि शस्त्राचे घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही माहिती कळताच कोतवाली पोलिसांचा ताफा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनीही तेथे भेट देऊन घटनाक्रम जाणून घेतला.याप्रकरणी आरोपी सौरभ घाटे आणि अर्शद आणि मुख्य सूत्रधार प्रवीण घाटे या तिघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.पोलिसावर हल्लाया घटनेपूर्वी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अक्सा मशिद जवळ पोलीस हवालदार सुनील पांडुरंग शिंदे हे आज सकाळी ९ वाजता कर्तव्य बजावत होते. तेथे आरोपी शेख रशीद शेख नजीर (४०) पोहोचला. त्याने हवालदार शिंदे यांच्या समोर येऊन त्यांना 'तू येथून निघून जा. आमच्या लोकांना नमाज पडायची आहे. तू लवकर निघ, नाही तर तुला जीवे ठार मारेल', असे म्हणून वाद घातला. त्यानंतर धारदार शस्त्र काढून हवालदार शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. शिंदे यांच्या गळ्यावर आरोपीने वार केला. तो शिंदे यांनी हुकवला. नंतर हाताला, नाकाला आणि दंडावर घात बसल्याने ते जबर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आजूबाजूचे पोलीस आणि काही सामाजिक कार्यकर्ते धावले. त्यांनी आरोपी शेख रशीदला पकडून त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला नंदनवन पोलिसांनी अटक केली.हुडकेश्वरजय हिंद नगर येथे ऋषिकेश आणि त्याचा भाऊ अमित मनोज पाटील राहतात. हे दोघे गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास पांडव कॉलेज ग्राउंडवर आले असताना तेथे आरोपी रोहित विजय तिडके (२०) याने त्यांच्याशी वाद घातला. तसेच धारदार शस्त्राने ऋषिकेशच्या पोटावर मारून त्याला गंभीर जखमी केले. अमित पाटीलच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी तिडकेविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. या सर्व घटनांपूर्वी एमआयडीसीत गुरुवारी पहाटे सम्राट विजय सिंग नामक तरुणाचा गळा धारदार शस्त्राने कापून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही, हे विशेष!पोलिसांसमोर मोठे आव्हान शुक्रवारी अक्षय तृतीया आणि ईद हे दोन मोठे सण असल्याने गुरुवारी सायंकाळपासून शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. अशा स्थितीत हत्या आणि ,हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे घडल्याने नागपुरातील गुन्हेगार सैराट झाल्याचे उघड झाले आहे. ही गुन्हेगारी मोडून काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.