लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरात दोन लाख कोटींचे बोगदे बनविणे सुरू आहे. बोगद्यांमुळे प्रवासाचे अंतर कमी होते. गंतव्य ठिकाणी लवकर पोहचणे शक्य होते. बोगदे बनविताना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
हिमाचल प्रदेशात रोहतांग येथे अटल बोगद्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच हिमाचल प्रदेशात आज ६,१५५ कोटींच्या २२२ किमी लांबीच्या महामार्गाच्या नऊ प्रकल्पांचा शिलान्यास व लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री जन. व्ही. के. सिंग व अन्य उपस्थित होते.
हिमाचल प्रदेशाची तुलना स्वित्झर्लंडशी केली जाते. याला अधिक सुंदर करण्यासाठी कष्ट करावे लागतील.
रस्ते निर्माणामुळे संबंधित क्षेत्र हे प्रगतीकडे जाते. रस्तेच क्षेत्राचे भविष्य बदलू शकतात. हिमाचलमध्ये २३ बोगदे बनविले जात आहेत. यापैकी आठ बोगद्यांचे काम सुरू असून, उर्वरित बोगदे वर्षभरात बनविले जातील. रस्त्याशेजारी लहान लहान गावांचा विकास व्हावा, या दृष्टीने नियोजन करून विकास साधला जावा, असेही ते म्हणाले.
आगामी काळात हिमाचलमध्ये १५०० कोटी रुपयांचे ४२१ किमी लांबीचे महामार्ग होणार
आहे. रस्त्यांची कामे करताना भूसंपादनात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात. सध्या १० हजार कोटींची रस्त्याची कामे सुरू आहेत. हा प्रदेश पहाडीक्षेत्राचा असल्यामुळे रोप वे, केबल कारच्या माध्यमातून एका पहाडावरून दुसऱ्या पहाडावर जाता येणे शक्य होणार आहे. दोन लाख कोटी खर्च करून रोप वे, केबल कार, बायनाकुलर रेल्वे हे प्रकल्प येथे राबवू. राज्य शासनाने यासंदर्भात धोरण तयार करावे.
जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून हे प्रकल्प राबवू. यामुळे हजारोंना रोजगार मिळेल. हिमाचल प्रदेश जगातील सुंदर, स्वस्त, आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.