लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ध्यानीमनी नसताना सायबर गुन्हेगाराने १६ दिवसात एका व्यक्तीच्या खात्यातून २ लाख रुपये काढून घेतले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुरेश बुद्धाजी देशमुख (वय ५२) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. ते वानाडोंगरीच्या वैभव नगरात राहतात. त्यांना एटीएमचा व्यवहार करता येत नाही. त्यामुळे त्यांना जेव्हा एटीएममधून रक्कम काढायची असते, त्यावेळी ते मुलाला सोबत घेऊन जातात. पैशाची गरज असल्याने शुक्रवारी ते त्यांचा मुलगा सुरजसोबत एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी रक्कम निघत नव्हती. त्यामुळे त्यांनी सरळ सेंट्रल बँकेच्या वानाडोंगरी शाखेत धाव घेतली. तेथे त्यांनी बँक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी त्यांना बँक व्यवस्थापकाने तुमच्या खात्यात केवळ ७८० रुपये शिल्लक आहेत, असे सांगितले. देशमुख यांना बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्याचे स्टेटमेंट दिले. त्यात १ ते १६ सप्टेंबर २०२१ दरम्यान त्यांच्या खात्यातून वेगवेगळी अशी एकूण २ लाख २ हजार ५५९ रुपयांची रक्कम ऑनलाईन काढण्यात आल्याचे दिसले. देशमुख यांनी एमआयडीसी पोलिसांकडे याविषयी तक्रार नोंदवली. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
---