सुमेध वाघमारे
नागपूर : विदर्भात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येऊ लागला आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ४६ टक्के रुग्ण ऑक्टोबर महिन्यात कमी झाले. सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन लाखाचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे, ही रुग्णसंख्या ओलांडण्यास २३३ दिवसाचा कालावधी लागला. पहिल्या १७० दिवसात ५० हजार रुग्ण तर त्यानंतरच्या ६३ दिवसात दीड लाख रुग्णांची भर पडली.
विदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या १,०३,२५७ तर मृतांची संख्या ३,४२० वर पोहचली आहे. नागपूरनंतर अमरावती जिल्ह्यात रुग्ण अधिक दिसून आले. १६,३६३ रुग्ण व ५,८९४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दुपटीने रुग्णसंख्या वाढल्याने हा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात १५,९९० रुग्ण व २३६ मृत्यू झाले आहेत. चौथ्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा असून, १०,२९० रुग्ण तर ३५० मृत्यू झाले आहेत. पाचव्या क्रमांकावर गोंदिया जिल्हा आहे. ९,८८४ रुग्ण तर १२९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय बुलडाणा जिल्ह्यात ९,५१३ रुग्ण व १२६ मृत्यू, अकोला जिल्ह्यात ८,४२८ रुग्ण व २८१ मृत्यू, भंडारा जिल्ह्यात ८,५९९ रुग्ण व २२१ मृत्यू, वर्धा जिल्ह्यात ६,३५९ रुग्ण व २१२ मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यात ६,०१६ रुग्ण व ६० मृत्यू तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी, ५,७१७ रुग्णांची नोंद झाली असून, मृतांची संख्या १४३ वर गेली आहे.
- सप्टेंबर महिन्यापासून वाढला कोरोनाचा वेग
विदर्भात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. सुरुवातीला कोरोनाचा वेग संथ होता. यामुळे ५० हजार रुग्ण गाठण्यास १७० दिवसाचा कालावधी लागला. २८ ऑगस्ट रोजी ५२,४८३ रुग्णांची नोंद होती. परंतु सप्टेंबर महिन्यापासून वेग वाढला. केवळ १७ दिवसात, १७ सप्टेंबर रोजी एक लाख रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर १५ दिवसातच २ ऑक्टोबर रोजी ५० हजार नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या १,५१,३११ वर पोहचली. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या मंदावली. यामुळे नव्या ५० हजार रुग्णांची भर पडायला ३१ दिवसाचा कालावधी लागला.