लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर-वधूला आलेल्या गिफ्ट पाकिटमधील दीड ते दोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धमाननगरातील एका लॉनमध्ये शनिवारी मध्यरात्री ही चोरीची घटना घडली.नंदनवनमधील रहिवासी अनिल सुधाकर कुंभारे (वय ३४) यांच्या भावाच्या लग्नाचा स्वागत समारंभ वर्धमाननगरातील जुना भंडारा मार्गावरच्या सात वचन लॉनमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आला होता. रात्री ११.३० नंतर स्वागत समारंभ पाहुण्याच्या गर्दीने भरात आला. वर-वधू दोन्हीकडील मंडळी आपापल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात गुंतली. वर-वधूला आलेली पैशाची पाकिटे कुंभारे यांनी एका बॅगमध्ये ठेवली. पाहुण्यांसोबत फोटो काढण्याच्या घाईगडबडीत पैशाची ही बॅग काही वेळेसाठी कुंभारे यांनी बाजूला ठेवली. नेमकी संधी साधून चोरट्याने ही दीड ते दोन लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. सर्व आटोपल्यानंतर पैशाची बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे समारंभस्थळी एकच खळबळ निर्माण झाली. कुंभारे यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.एकसारख्याच घटना, लहान मुलांचा वापरलग्न समारंभातून पैशाची, दागिन्याची बॅग चोरीला जाण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. बॅग चोरीच्या घटना एकसारख्याच आहेत. त्यामुळे एकाच टोळीकडून या चोऱ्या झाल्या असाव्या, असा संशय आहे. विशेष म्हणजे, समारंभ स्थळी झालेल्या चोरीच्या बहुतांश घटनांमध्ये बॅग लंपास करण्यासाठी छोट्या मुलांचा वापर करण्यात आल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले आहे.