नागपूर : अकाली जन्माला आलेल्या जुळ्या बाळांमधील एका ६०० ग्रॅम वजनाच्या १९ दिवसांच्या बाळावर ९ दिवसांच्या अंतराने दोन मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. यातील एक शस्त्रक्रिया पोटावर तर दुसरी हृदयाजवळ करण्यात आली. इतक्या कमी वजनाच्या व कमी दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे नागपुरातील वैद्यकीय इतिहासामधील अलीकडच्या काळातील हे पहिले उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील एका महिलेच्या लग्नाला १० वर्षे होऊनही मूल होत नव्हते. यामुळे त्या दाम्पत्याने ‘आयव्हीएफ’ करण्याचा निर्णय घेतला. स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर यांच्या मार्गदर्शनात या उपचार पद्धतीला यश आले. जुळी बाळे होणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. परंतु साडेसहा महिने होत नाही तोच महिलेला प्रसूतीला पुढे जावे लागले. अकाली प्रसूतीमुळे दोन्ही बाळांचे वजन ८०० ग्रॅम होते. यातील एका बाळाची प्रकृती नाजूक होती. त्याला श्वासही घेता येत नव्हता आणि पोटात दूधही राहत नव्हते. यामुळे वजन झपाट्याने कमी होऊन ६०० ग्रॅमवर आले. डॉ. योगेश टेंभेकर यांनी सांगितले, या बाळामध्ये श्वास घेतल्यानंतर जिथे हवा जायला पाहिजे होती तिथे ती जात नव्हती. यामुळे बाळ १० दिवसांचे असताना ‘एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी’ ही पोटावर शस्त्रक्रिया केली. पेडियाट्रिक सर्जन डॉ. चंद्रशेखर फांदे व डॉ. तुषार ठाकरे यांनी ही शस्त्रक्रिया केली. परंतु शस्त्रक्रियेनंतर हृदयाच्या आजूबाजूला जी पोकळी असते तिथे पाणी भरणे सुरू झाले. बाळाचा जीव धोक्यात आला होता. बाळ १९ दिवसांचे असताना दुसऱ्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. पेडियाट्रिक कार्डीओलॉजी डॉ. प्रमोद आंबटकर, डॉ. संदीप यादव व डॉ. आशिष अखुज यांनी अत्यंत गुंतागुंतीची व जोखमीची शस्त्रक्रिया केली. कमी दिवसांच्या व कमी वजनाच्या बाळावर दुर्मिळातील दुर्मीळ अशी ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वी केली.
महिन्याभरानंतर बाळाचे वजन १.६२५ किलो ग्रॅम
दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर बाळ ‘एनआयसीयू’मध्ये उपचाराला होते. विशेष उपचारांमुळे बाळाची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. १०० दिवसांनंतर बाळाचे वजन ६०० ग्रॅमवरून १.६२५ किलो ग्रॅम झाले. तो स्वत:हून आईचे दूध घेत असल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता एक महिन्यानंतर बाळाची पुन्हा तपासणी केली असता बाळ सुदृढ असल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या सामूहिक प्रयत्नाने बाळाला जीवनदान मिळाल्याचे डॉ. टेंभेकर म्हणाले.