नागपूर: बुधवारी काटोल रोडवर एका अज्ञात वाहनाने सहा वन्यप्राण्यांचा बळी घेतला. दोन मसन्याउद आणि चार साळींदरांच्या शरीराचा अक्षरश: चेंदामेंदा केला. यात साळींदराच्या दोन पिल्लांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार काटोल नाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर सकाळी ९ वाजताच्या दरम्यान या अपघाताची नोंद करण्यात आली. अज्ञात वाहनाने दोन मसन्याउद व दोन पिल्लांसह चार साळींदरांना एका रांगेत चिरडले.
चाकाखाली आलेल्या या प्राण्यांचा चेंदामेंदा झाला. सुचना मिळाल्यानंतर नागपूरचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांच्या आदेशानुसार वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्राणी रस्ता ओलांडताना हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. वनविभागाकडून याबाबत सविस्तर चौकशी केली जात असल्याची माहिती डॉ. हाडा यांनी दिली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणी ठार झाल्याने संशय आणि महामार्गावर प्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.