नागपूर : मेयो, मेडिकलमधील इंटर्न डॉक्टरांचा संप शनिवारी मिटत नाही तोच मेडिकलच्या दोन निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याने निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने संपाचे हत्यार उपसले. शनिवारी सायंकाळी मेडिकल चौकात फळ विकत घेण्यासाठी गेलेल्या दोन डॉक्टरांशी इंडिगो कारमधून आलेल्या तीन ते चार अज्ञात इसमाने वाद घालून मारहाण केली. या प्रकरणाच्या विरोधात ‘मार्ड’ने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रात्री नऊ वाजूनही दोषींना अटक झाली नसल्याने ‘मार्ड’ने काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला. शासकीय रुग्णालयाचे कणा असलेले निवासी डॉक्टरच संपावर गेल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली.
प्राप्त माहितीनुसार, रमजान महिना सुरू असल्याने दोन निवासी डॉक्टरांचे उपवास (रोजे) सुरू आहेत. सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान फळ विकत घेण्यासाठी मेडिकल चौकात आले. हातठेल्यावरील फळ विकत घेऊन दुचाकीवर बसत असताना एका अज्ञात इसमाला चुकून पाय लागला. डॉक्टरांनी माफीसुद्धा मागितली. परंतु त्या इसमासोबत असलेल्या दोघांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. एकाने दुचाकीची चावी काढली. डॉक्टरांनी स्वत:ची ओळख देत उपवास सुरू असल्याचेही सांगितले. परंतु त्या इसमाने आणखी दोघांना बोलाविले. त्यांच्या हातात गोटे होते. त्याचवेळी त्या अज्ञात इसमाने डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेने लोक जमा होताच मारहाण करणारे ‘एमएच३१ डीसी५६३३’ या क्रमांकाच्या इंडिगो कारमधून पळून गेले. याची माहिती इतर निवासी डॉक्टरांना मिळताच मेडिकलचे १००वर डॉक्टर मेडिकल चौकात जमा झाले. जखमी डॉक्टरांना मेडिकलच्या कॅज्युअल्टीत दाखल केले. मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सजल बंसल यांच्या नेतृत्वात अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. बंसल म्हणाले, रात्री आठ वाजेपर्यंत दोषींना अटक न झाल्यास आम्ही काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु नऊ वाजूनही कोणालाच अटक झाली नसल्याने काम बंद आंदोलन हाती घेण्यात आले. जोपर्यंत दोषींना अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असेही डॉ. बंसल यांनी सांगितले.
- मेडिकलमधील रुग्णसेवा ढासळण्याची शक्यता
मेडिकलमध्ये ८३६ कोरोनाचे तर, ५००वर नॉन-कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या सेवेत २४ तास निवासी डॉक्टर असतात. विशेषत: कोविड रुग्णाच्या वॉर्डात फार कमी वरिष्ठ डॉक्टर जात असल्याने निवासी डॉक्टरांवरच या रुग्णांचा भार होता. परंतु आता हेच डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवा ढासळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.