नागपूर : शनिवारी आकाशातून अग्निगाेळे खाली काेसळल्यामुळे बहुतेक जुन्या जाणकारांना अमेरिकेच्या ‘स्कायलॅब’ची आठवण झाली. अमेरिकन अंतराळ संशाेधन संस्था नासाने अंतराळात पाठविलेली ही प्रयाेगशाळा पृथ्वीवर काेसळणार म्हणून १९७९ साली जगभरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले हाेते.
नासाने १४ मे १९७३ साली ‘स्कायलॅब’ नावाचे भव्यदिव्य व शक्तिशाली स्पेस स्टेशन अंतराळात नेले हाेते. ७७,१११ किलाेग्रॅम वजनाची ही अंतराळ प्रयाेगशाळाच हाेती. याचा मुख्य उद्देश मानवी शरीरावर दीर्घकाळात वजनरहित अवस्थेचा काय परिणाम हाेताे, याचा अभ्यास करणे हा हाेता. १९७३ ते १९७९ एवढा प्रदीर्घ वेळ ही प्रयाेगशाळा अंतराळात हाेती. त्या काळात एवढे प्रगत तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे ही स्कायलॅब अंतराळात नेली; पण ती सुरक्षितपणे पृथ्वीवर कशी आणायची किंवा अंतराळात कशी स्थापन करायची, हा ताळमेळ जुळला नाही आणि ही भव्यदिव्य प्रयाेगशाळा आपली कक्षा सांभाळू शकली नाही.
ही स्कायलॅब पृथ्वीच्या वातावरणात कधी शिरणार, कुठे आणि कधी पडणार, यावर काही नियंत्रण नव्हते. त्यामुळे जगभरात गाेंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान स्कायलॅब हिंद महासागर आणि ऑस्ट्रेलियाच्या ७४०० किलाेमीटरच्या परिघात काेसळेल असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया व भारतीय उपमहाद्वीपात राहणाऱ्यांमध्ये भीतीचा विस्फाेटच झाला. स्कायलॅब काेसळेल आणि आपण मरू, या भीतीने अक्षरश: लाेक सैरभैर झाल्याचे जुने जाणकार सांगतात. ११ जुलै १९७९ ला स्कायलॅब झपाट्याने पृथ्वीच्या दिशेने येऊ लागली. अखेर स्कायलॅबचा माेठा भाग हिंद महासागरात आणि काही भाग पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये काेसळला. सुदैवाने काेणतीही जीवितहानी झाली नाही. एक माेठा अनर्थ टळला आणि लाेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रशिया-युक्रेन युद्धाचेही सावट
सध्या रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू आहे. त्याचा प्रभाव जनमानसावर आहे. शनिवारी अग्निगाेळे पडल्याने दाेन देशांतील युद्धाची व्याप्ती भारतापर्यंत आली की काय, अशा चर्चा सर्वत्र रंगली हाेती.
२०१२ ला काटाेलमध्ये उल्का
२२ मे २०१२ राेजी नागपूर जिल्ह्यातील काटाेलमध्ये अशाप्रकारे अग्निवर्षा झाली हाेती. त्यानंतर हा उल्कावर्षाव असल्याचे स्पष्ट झाले. भूगर्भ शास्त्रज्ञांनी त्याचे निरीक्षण केले हाेते. ७ ते ८ इंचीचे तुकडे जमा करून त्यावर अभ्यास करण्यात आला हाेता. शनिवारचा प्रकार उल्कावर्षाव नसल्याने भारतीय भूगर्भशास्त्र विभागाने हात वर केले.