नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करुन १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या तपासाला गती मिळाली आहे. बेळगाव येथील तुरुंगातून फोन करणारा आरोपी जयेश पुजारी याच्याकडून नागपूर पोलिसांच्या तपास पथकाने दोन मोबाईल व दोन सीमकार्ड जप्त केले आहेत. जयेशविरोधात हे मोठे पुरावे असून त्याला लवकरच चौकशीसाठी नागपुरात आणण्यात येणार आहे.
२१ मार्च रोजी सकाळी १०.५३ रोजी गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. यानंतर खळबळ उडाली होती. पोलिस यंत्रणादेखील लगेच कामाला लागली. फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी अशी सांगितली होती. एका महिलेचा नंबर देऊन त्याने तिला गुगल पेवर १० कोटी रुपये भरण्यास सांगितले. १४ जानेवारीप्रमाणे हा फोनदेखील बेळगाव कारागृहाच्या परिसरातून आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचे पथक बेळगावसाठी रवाना झाले आहे.
तपास पथकाने बेळगाव तुरुंगातील अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने जयेश कैद असलेल्या बॅराक तसेच तुरुंगात शोधमोहीम राबविली. पोलिसांना तेथून दोन मोबाईल व दोन सीमकार्ड मिळाले. आरोपी जयेशविरोधात हा मोठा पुरावा मानण्यात येत असून मोबाईल्सला फॉरेन्सिक तपासासाठी पाठविण्यात आले आहे. जयेशला नागपुरात चौकशीसाठी आणण्यासाठी प्रोडक्शन वॉरंट जारी करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.