नागपूर : सीसीटीव्ही फुटेज पाहून तीन गुन्ह्यातील ४९ हजार रुपये किमतीच्या मोबाईलसह दोन आरोपींना लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुरुवारी अटक केली.
नागपूर रेल्वेस्थानकावर दोन प्रवाशांचे ३४ हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन्ही मोबाईल एकाच आरोपीने चोरी केल्याची बाब स्पष्ट झाली. पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेणे सुरू केल्यानंतर त्यांनी आरोपी संदीप किसन फुंडे (२३) रा. खमारी, अंगणवाडी शाळेसमोर गोंदिया यास अटक केली. त्याच्याकडून ३४ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. दुसऱ्या घटनेत १५ जुलै रोजी सेकंड क्लास बुकिंग हॉलमधून एका प्रवाशाचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला होता. त्या प्रवाशाने २२ जुलै रोजी लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा मोबाईल आरोपी सुरेंद्र तामसिंग रहांगडाले (३०) रा. जेवनारा पोवारी मोहल्ला, ता. बरघाट जि. सिवनी, मध्य प्रदेश हल्ली मुक्काम जयस्वाल धाबा कापसी, भंडारा रोड याने चोरी केल्याची माहिती मिळाली. लगेच पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सतीश जगदाळे, उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी, संजय पटले, शैलेश उके, सचिन ठोंबरे, मुकेश नरुले, रोशन मोगरे, प्रवीण खवसे, योगेश घुरडे यांनी पार पाडली.
...............