स्वयंपाकीण महिलांचा सवाल : छोट्या मुलांसह महिला धरणे आंदोलनात सहभागीगणेश खवसे - नागपूर स्वयंपाक पर्यायाने जेवणाला आपण १०-१५ दिवस अशी लांब सुटी कधीतरी देतो का, मग आम्हालाच दोन महिने सुटी कशासाठी? १२ महिन्यांपैकी केवळ १० महिनेच काम देता कशाला असा सवाल उपस्थित करीत १२ महिन्यांचे नियमित वेतन देण्यात यावे अशी मागणी शालेय स्वयंपाकीन महिलांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त शालेय स्वयंपाकीण महिला संघाच्या वतीने आज, सोमवारपासून धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात महिलांसह त्यांची छोटी - छोटी मुलेसुद्धा सहभागी झाली आहेत. या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी पहाटेच्या सुमारास ६०० हून अधिक महिला पटवर्धन मैदानात पोहोचल्या. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांसह विदर्भाबाहेरील जिल्ह्यातूनही महिला स्वयंपाकीण या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत, हे विशेष! बाहेरगावाहून आलेल्या या महिलांकडे थंडीपासून वाचण्यासाठी पुरेसे उनी कपडे नाहीत. त्यांच्यासोबत दीड - दोन वर्षांपर्यंतची छोटी - छोटी मुलेसुद्धा आहेत. आंदोलनस्थळी या महिलांची नारेबाजी सुरू होते. तेव्हा त्या आवाजामुळे छोट्या मुलांना काहीतरी भयंकर घडले असावे, असे वाटून ती रडू लागतात. या महिलांच्या जेवणाचीही योग्य ती व्यवस्था नाही, अशात त्या मातांचे मुलांकडेही दुर्लक्ष होत आहे. कुणी या महिलांना भेटण्यास गेल्यावर मुलेही तेवढ्याच उत्सुकतेने पाहू लागतात. काही मुले खेळण्यात व्यस्त राहतात. आंदोलकांपैकी एका महिलेसोबत चर्चा केली असता पोटाला पुरेशी भाकर मिळावी, बारा महिने काम-बारा महिने सेवा आणि बाराही महिने पगार मिळावा असे कुणाला वाटत नाही असा प्रश्न उपस्थित करीत आता मुलाला चटके सहन करावे लागतील तरी चालेल मात्र आंदोलनातून मागे हटणार नाही, असा निर्धार केला. तिच्यासोबतचा दोन वर्षाचा मुलगा त्याच्याच वयाच्या मुलासोबत खेळण्यात मग्न होता.या आंदोलनात चंदा दमाहे, ज्योती लांडगे, प्रमिला राऊत, प्रमिला बडगे, केसर राऊत, मीना राऊत, हिरण वाढई, ललिता मच्छिरके, गीता वाहाणे, ममता वैद्य, सुरेखा वऱ्हाडे, अनिता तांडेकर, लीला कुंभरे, राधिका लाडेकर, राधिका मेंढे, गुणवंता मेश्राम, वर्षा वठ्ठी, लशवंती नागपुरे यांच्यासह शेकडो महिला आणि संघटनेचे अध्यक्ष तिरुपती कोंडागोर्ला, मनोज दमाहे, केसर राऊत, राधेश्याम गाडेकर आदी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
दोन महिन्यांसाठी आम्हाला सुटी कशासाठी?
By admin | Published: December 16, 2014 1:06 AM