लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात विशेष पथकाने मंगळवारी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. अंभोरा उपसा सिंचन योजना टप्पा दोन तसेच सिंदपुरी व शेंद्री मुख्य कालव्याच्या कामाशी संबंधित प्रकरणी चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के, तत्कालीन कार्यकारी अभियंता उमाशंकर पर्वते व वसंत गोन्नाडे, तत्कालीन विभागीय लेखाधिकारी चंदन जीभकाटे व अरविंद जीभकाटे यांच्यासह तत्कालीन अधीक्षक अभियंता दिलीप पोहेकर, तत्कालीन मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या विरोधात सदर पोलीस ठाण्यात अप क्र. २५१/१८ कमल १३ (१) (क), (ड) सह १३ (२)ला.प्र. कायदा १९९८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.राज्य सरकारने सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याचे निर्देश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी चौकशी वेगाने पूर्ण करण्यासाठी २७ एप्रिल २०१८ रोजी दोन विशेष पथकांची स्थापना केली होती. यापैकी एक पथक नागपूरला व दुसरे अमरावतीला नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार नागपूर येथील विशेष तपास पथकाने मंगळवारी (१७ जुलै) संबंधित गैरव्यवहाराची उघड चौकशी करण्याचे आदेश चौकशी अधिकाऱ्यांना दिले. चौकशीदरम्यान निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे व त्यात जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी चौकशी अधिकाºयांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अंभोरा उपसा सिंचन योजना टप्पा २ संबंधित कामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदा कामाचे मूल्य वाढविण्यात आले. कार्यकारी संचालक यांनी त्याला मंजुरी दिली. याबाबत चौकशी केली असता तसे सिद्ध झाले.सिंदपुरी व शेंद्री मुख्य कालव्याचे काम गोसीखुर्द (बुज) उपसा सिंचन योजनेच्या सिंदपुरी मुख्य कालव्याचे कि.मी १.९२ मधील तसेच शेंद्री शाखा कालव्याच्या कि.मी. १ ते २.५६ मधील माजी कामासह पेव्हर मशीन व बॅचिंग प्लॉटद्वारे अस्तरीकरण व त्यावरील बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य अद्यावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढविण्यात आल्याचे व त्याला मंजुरीही दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
सिंचन घोटाळ्यात आणखी दोन गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:24 PM
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात विशेष पथकाने मंगळवारी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. अंभोरा उपसा सिंचन योजना टप्पा दोन तसेच सिंदपुरी व शेंद्री मुख्य कालव्याच्या कामाशी संबंधित प्रकरणी चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली आहे.
ठळक मुद्देविशेष तपास पथकाची कारवाई : निविदेचे मूल्य वाढविल्याचे उघड