नागपूर : उद्धव ठाकरे गटातील दोन खासदार उरले व १० आमदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येणार आहेत. फक्त मूहुर्त निघायचा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी लवकरच हे सर्व खासदार-आमदारांचे प्रवेश झालेले दिसतील, असा दावा शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला.
तुमाने म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी खासदारांची बैठक घेतली. तीत १३ खासदार उपस्थित होते. १० महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्याची तयारी कशी करायची, महायुतीचा प्रचार कसा असेल यावर चर्चा झाली. भाजप- शिवसेनेची नैसर्गिक युती आहे. त्यामुळे आगामी निवडणूक युतीच लढेल, हे निश्चत आहे. सध्या जागावटप ठरलेले नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकत्र बसून जागा वाटप निश्चित करतील, असेही त्यांनी सांगितले.
सर्वच खासदारांना तिकीट
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या सर्वच खासदारांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. यात किंतू परंतु नाही, असा दावाही खा. तुमाने यांनी केला. शिंदे- फडणवीस यांच्यात उत्तम सम्नवय आहे. दोन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतात. त्यामुळे कुणालाही कुठलिही अडचण नाही. राज्यभरातून वर्षा बंगल्यावर प्रवेश सुरू आहे. येत्या काळात हा ओघ आणखी वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.