लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या १८ तासात हत्येचे दोन गुन्हे घडले. पहिली घटना गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास रिपब्लिकन नगरात, तर दुसरी घटना शुक्रवारी दुपारी वसनशहा चाैकाजवळ घडली. यामुळे जरीपटक्यात थरार निर्माण झाला आहे.
जरीपटक्यातील रिपब्लिकन नगरात राहणारा रोहित किसनाजी वाघमारे (वय २५) आणि त्याचा चुलत भाऊ पियुष किशोर भैसारे (२४, रा. लष्करीबाग) हे दोघे गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास जात असताना, त्यांना रिपब्लिकन नगरातच राहणारे देवीदास जेठाजी जांभूळकर (६०), तसेच त्यांची मुले हर्षद (३४), भूपेंद्र (३३) आणि शैलेंद्र (२६) यांनी रोखले. जुन्या भांडणाचा विषय काढून जांभूळकर बाप-लेकांनी वाघमारे आणि भैसारेला मारहाण केली. ते आपल्या साथीदारांना फोन करून बोलावत असल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपी शैलेंद्र जांभूळकरने वाघमारेवर चाकूहल्ला चढवला. त्याच्या मदतीला धावलेल्या भैसारेवर देवीदास जांभूळकरने लोखंडी सळाखीने हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला.
माहिती कळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी धावले. तोवर आजुबाजूच्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पण तेथे डॉक्टरांनी वाघमारेला मृत घोषित केले. पोलिसांनी भैसारेच्या जबाबावरून आरोपी जांभूळकर बाप-लेकांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा ६ एप्रिलपर्यंत पीसीआर मिळवला.
आरोपी जांभूळकर आणि मृत वाघमारे यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. होळीच्या दिवशी जांभूळकरच्या घराजवळ लघुशंका केल्यावरून या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले. वाघमारे अवैध दारूविक्री करायचा. तो गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. तो धोका करेल, असा संशय असल्याने आरोपी बाप-लेकांनी त्याचा गेम केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
कॅटरर्सची दिवसाढवळ्या हत्या
हत्येची दुसरी घटना शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास वासनशहा चौकाजवळ घडली. जितू गरगानी नामक केटरिंग व्यावसायिकावर अज्ञात आरोपींनी घातक शस्त्राने हल्ला चढवून त्याची हत्या केली. या हत्याकांडाचे कारण वृत्त लिहीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. जितूचे कुणासोबत वैमनस्य नव्हते. त्याला आई आणि दोन बहिणी आहेत. तो सरळ, साध्या वृत्तीचा होता. त्यामुळे त्याची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली, असा प्रश्न आहे. रात्रीपर्यंत या प्रकरणात दोन संशयितांची नावे पुढे आली असली तरी, वृत्त लिहीपर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती. लवकरच आरोपींना अटक करू, असे यासंबंधाने ठाणेदार नितीन फटांगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.