लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन वर्षाच्या रणधुमाळीत नागपुरात दोन ठिकाणी एका गुंडासह दोन जणांच्या खुनाची घटना घडून नव वर्षाच्या जल्लोशाला गालबोट लागले. पहिली घटना एमआयडीसी तर दुसरी इमामवाडा भागात घडली.एमआयडीसी भागात स्वागताची तयारी करणाऱ्या तरुणाच्या अंगणात जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांना संतप्त तरुणांनी काठी आणि दगड, विटांनी ठेचून काढले. त्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. रंजित ऊर्फ लडी रामप्रसाद धानेश्वर (वय १९) असे मृताचे तर सन्नी ऊर्फ नस्सू असे जखमीचे नाव आहे.खुनाची दुसरी घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे दोने गटात झालेल्या सशस्त्र हाणामारीत एकाचा मृत्यू झाला तर चार जण जबर जखमी झाले.एमआयडीसीतील राजीवनगरात सचिन काळेच्या घरासमोर सचिन आणि त्याचे मित्र नववर्षाच्या स्वागताची तयारी करीत होते. त्यासाठी त्यांनी डीजे लावला होता. सोमवारी मध्यरात्र होत असताना या भागातील गुंड रंजित ऊर्फ लडी आणि सन्नी ऊर्फ नस्सू तेथे आले. त्यांनी सचिनच्या घरासमोर नाचून गोंधळ घालणे सुरू केले. यावेळी सचिन आणि त्याच्या मित्रांनी या दोघांना विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ केली. त्यावरून त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी कसा बसा वाद निवळला. लडी आणि नस्सूला हुसकावून लावल्यामुळे ते शिवीगाळ करीत तेथून घराकडे गेले. परिणामी संतप्त झालेले सचिनचे साथीदार आरोपी गोवर्धन लाला राऊत (वय २१), शंकर लाला राऊत (वय १९), नितेश काळे (वय २३), उमादास लिल्हारे (वय २०), मंगेश काळे (वय २६), स्वप्नील काळे (वय १९) यांनी लडीच्या घराकडे धाव घेतली. तेथे त्यांनी शेकोटी पेटविलेले लाकडी दांडके, विटा, दगड उचलून लडी आणि सन्नीला बेदम मारहाण केली. त्यामुळे लडीचा मृत्यू झाला तर सन्नी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे राजीवनगर, झेंडा चौक परिसरात एकच थरार निर्माण झाला.थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची पथके या भागात गस्त करीत होती. माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार भारत क्षीरसागर त्यांच्या सहकाऱ्यांसह तिकडे धावले. त्या पाठोपाठ पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आणि इतर अधिकाऱ्यांनीही धाव घेतली.जखमी सन्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. लडीची आई कुसुमबाई रामप्रसाद धानेश्वर (वय ५०, रा. राजीवनगर) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना रात्रीच अटक केली.दोघेही गुन्हेगारमृत लडी आणि जखमी सन्नी ऊर्फ नस्सू हे दोघेही गुन्हेगारी वृत्तीचे होते. लडीविरुद्ध हल्ला करून जखमी करण्याचे दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगतात. सन्नी हा चोरी, लुटमारीचा सराईत गुन्हेगार आहे.इमामवाड्यात गुंडांचा हैदोस ; तरुणाचा खून, तणावइमामवाड्यातील इंदिरानगर, जाटतरोडी भागात सोमवारी रात्री ११ च्या सुमारास सूरज कैलास बारमाटे (वय २९) आणि त्याचा मित्र राजेश सहारे हे दोघे जाटतरोडी तीनमधील मैदानाकडे लघुशंकेला गेले. तेथे आरोपी ऋषिकेश आणि त्याचे दोन मित्र दारू पित बसले होते. सूरज आणि राजेशला पाहून त्यांनी इकडे कशाला आले असे म्हणून या दोघांशी वाद घातला. एवढेच नव्हे तर आरोपी मुकुल ऊर्फ टिंक्या पडोळे (वय १९), शुभम ऊर्फ सर्किट तायडे (वय २०), गिरीश देवराव वासनिक (वय ३०) यांनी सूरज तसेच राजेशला मारहाण केली. एवढेच नव्हे तर काही वेळेनंतर ऋषिकेश, शुभम आणि त्याचे दोन साथीदार तलवारीसारखे घातक शस्त्र घेऊन बारमाटेच्या घरावर चालून आले. त्यांनी शस्त्र फिरवल्यामुळे सूरजच्या नाकाला जखम झाली. त्याला वाचविण्यासाठी धावलेला त्याचा भाऊ शुभम बारमाटे याच्या हाताला तर रविना बारमाटे हिच्या कपाळाला जखम झाली. त्यानंतर आरोपींनी अजय विश्वकर्माच्या दोन्ही पायावर शस्त्राचा वार केला. महेश रामधार पाल हे यावेळी बचावले. या घटनेच्या काही वेळेनंतर आरोपी शुभम ऊर्फ सर्किट तायडे, मुकुल ऊर्फ टिक्या पडोळे, गिरीश वासनिक आणि ऋषिकेश उईके तसेच त्यांचे दोन साथीदार धारदार शस्त्र घेऊन अक्षय लेखराम वाघमारे (वय १९) याच्या घरावर हल्ला चढवला. त्याच्या बंद दाराला लाथ मारली. त्यामुळे अक्षयचा भाऊ आकाश ऊर्फ दीपक लेखराम वाघमारे (वय २५) याने दार उघडले. त्याला बघताच आरोपींनी त्याला घरातून खेचून बाहेर काढले. त्याला राजू सांडिलच्या घरासमोर ओढत नेले आणि तेथे त्याच्या पोटावर चाकूचे अनेक घाव घातले. त्यामुळे आकाश ऊर्फ दीपकचा मृत्यू झाला.गुंडांच्या या टोळीचा नंतरही परिसरात हैदोस सुरूच होता. त्यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता. माहिती कळाल्याने इमामवाडा पोलीस तेथे पोहचले. त्यावेळी परिसरात प्रचंड तणाव होता. पोलिसांनी अक्षय वाघमारेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपी गिरीश वासनिकला अटक करण्यात आली असून, त्याच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत होते.
नवीन वर्षाच्या रणधुमाळीत नागपुरात गुंडासह दोघांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 8:02 PM
नवीन वर्षाच्या रणधुमाळीत नागपुरात दोन ठिकाणी एका गुंडासह दोन जणांच्या खुनाची घटना घडून नव वर्षाच्या जल्लोशाला गालबोट लागले. पहिली घटना एमआयडीसी तर दुसरी इमामवाडा भागात घडली.
ठळक मुद्देएमआयडीसी अणि इमामवाडा भागात घडल्या घटना