लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी, महावितरणने दोन अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले तर एका कर्मचाऱ्याला बडतर्फीची नोटीस बजावली आहे. महावितरणच्या कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र्र खंडाईत यांनी दिला आहे.खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेकडे फेब्रुवारी २०१४ पासून महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र्र होते, मात्र जुलै २०१७ पासून या पतसंस्थेने ग्राहकांनी वीजबिल भरणा केलेल्या रकमेचा पूर्णपणे भरणा न केल्याने कराराचा भंग केला आहे. जुलै २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेने तब्बल १९ लाख ७१ हजार ६४८ रुपये कमी जमा करीत या रकमेचा अपहार केला. सोबतच संस्थेने जुलै २०१७ पासून महावितरणला ग्राहकांनी भरणा केलेल्या रकमेचा हिशेब देणेही बंद केले होते. संबंधित वीजबिल भरणा केंद्रात ग्राहकांनी जमा केलेली रक्कम महावितरणकडे नियमितपणे जमा होत नसल्याचे निदर्शनास आल्याने महावितरणने सावनेर विभागाचे उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) प्रदीप युवराज पौनीकर आणि खापा उपविभागाचे सहायक लेखापाल रमेश क्रिष्णराव बोलधने या दोन अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे तर कनिष्ठ सहायक (लेखा) अक्षय दिलीप भालेराव या कंत्राटी कर्मचाऱ्यास महावितरणच्या सेवेतून बडतर्फ करण्याबाबतची नोटीस बजावत तीन दिवसाच्या आत स्पष्टीकरण मागविले आहे. वीजबिल भरणा केंद्राची रक्कम महावितरणकडे नियमित जमा होत आहे किंवा नाही याची शहानिशा करण्याची जवाबदारी वरील तिघांकडे होती, त्यांनी आपल्या कामात अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे.महावितरणचे ग्राहक सेवेला प्राधान्य असल्याने दैंनंदिन कामकाजात दिरंगाई, महावितरणची प्रतिमा मलीन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, कुणाचीही पाठराखण केली जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिला आहे.लाचखोरी प्रकरणातील सहायक अभियंता निलंबितवीजचोरीचे प्रकरण दाखल न करण्यासाठी एका व्यावसायिकाला लाच मागितल्याप्रकरणी नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या कोंढाळी येथील सहायक अभियंता कोहिनूर ताजने यास महावितरणने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
महावितरण महसूल अपहारप्रकरणी दोन अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 11:09 PM
वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी, महावितरणने दोन अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले तर एका कर्मचाऱ्याला बडतर्फीची नोटीस बजावली आहे.
ठळक मुद्देएकाला बडतर्फीची नोटीस