नागपूर : दाेन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दाेघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पादचाऱ्यासह एका ट्रेलरचालकाचा समावेश आहे. या घटना रामटेक पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील मनसर-रामटेक मार्गावरील वाहिटाेला व रामटेक-माैदा मार्गावरील चाचेर येथे घडल्या.
श्याम भय्यालाल रौतेल (५०, रा. वाहिटाेला, ता. रामटेक) व केशव शामराव काळे (४०, रा. दाबला, ता. मुलताई, जि. बैतुल, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. श्याम राैतेल बुधवारी (दि. ३०) सायंकाळी किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी पायी दुकानात जात हाेते. ते वाहिटाेला येथील बसस्टाॅप चाैकातून राेड ओलांडत असताना रामटेकहून नागपूरच्या दिशेने वेगात जाणाऱ्या एमएच-४०/वाय-५००४ क्रमांकाच्या बसने त्यांना जाेरात धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्यांना लगेच रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी त्यांना तपासणीअंती मृत घाेषित केले.
अपघाताची दुसरी घटना रामटेक-माैदा मार्गावरील चाचेर (ता. माैदा) शिवारात मंगळवारी घडली. केशव काळे हा एमएच-४०/एन-६७६७ क्रमांकाच्या ट्रेलरने रामटेकहून माैदा शहराच्या दिशेने जात हाेता. त्यातच चाचेर शिवारात त्याचा ट्रेलरवरील ताबा सुटला आणि ट्रेलर राेडलगतच्या नालीत शिरला. त्या ट्रेलरची केबीन उलल्याने त्यात दबून केशवचा मृत्यू झाला. या दाेन्ही प्रकरणात रामटेक पाेलिसांनी गुन्ह्यांनी नाेंद केली असून, तपास ठाणेदार प्रमाेद मकेश्वर करीत आहेत.
आठवडाभरात पाच जणांचा मृत्यू
रामटेक पाेलिस ठाण्याच्या हद्दीत अपघातांचे सत्र सुरू आहे. आठवडाभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. वारंवार हाेणारे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी वेळीच याेग्य उपाययाेजना करणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, या भागातील बहुतांश राेडची दुरुस्ती करण्यात आल्याने तसेच मनसर-तुमसर मार्गाचे चाैपदरीकरण करण्यात आल्याने वाहने अनियंत्रित वेगाने धावतात. त्यातून अपघात हाेतात, अशी माहिती काही सूज्ञ नागरिकांनी दिली. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.