सत्र न्यायालय : खापरखेडा चनकापूर येथील प्रकरणनागपूर : खापरखेड्याच्या चनकापूर येथील खुनी हल्ल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादीक मोहम्मद उमर यांच्या न्यायालयाने दोन आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शुभम अनिल पोटभरे (२०) आणि अजय अनिल पोटभरे (२४), अशी आरोपींची नावे असून ते चनकापूर येथील रहिवासी आहेत. जितेंद्र महेश पासवान (२१), असे जखमीचे नाव होते. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, घटनेच्या दिवशी सकाळच्या वेळी जितेंद्र पासवान याचा भाऊ धर्मेंद्र आणि छोटू यांच्यासोबत आरोपींचे भांडण होऊन मारपीट झाली होती. पानठेला चालविणाऱ्या जितेंद्र याला भांडणाबाबत समजताच तो का भांडण केले, याबाबत विचारणा करण्यासाठी पोटभरे बंधूंकडे गेला होता. दोघांनीही चाकूने जितेंद्र पासवान यांच्या छातीवर, पोटावर वार करून त्यांना गंभीररीत्या जखमी केले होते. सहायक पोलीस निरीक्षक इशाक शेख यांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तपास करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने उपलब्ध साक्षीपुराव्यांवरून दोन्ही आरोपींची भादंविच्या ३०७ (खुनाचा प्रयत्न) कलमांतर्गतची शिक्षा ३२६ (गंभीर दुखापत) कलमांतर्गतच्या शिक्षेत परिवर्तित करून तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीनेअतिरिक्त सरकारी वकील प्रफुल्ल कटारिया तर आरोपींच्या वतीने अॅड. प्रदीप खांबळकर यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक हेमंकुमार खराबे, सहायक फौजदार अरुण भुरे, अशोक शुक्ला यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)
खुनी हल्ल्यात दोघांना कारावास
By admin | Published: May 13, 2016 3:21 AM