नागपूर : ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा’कडून (एनएमसी) चंद्रपूर मेडिकल कॉलेजला मनोविकृती विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दोन जागेला मंजुरी मिळाली असली तरी आवश्यक मनुष्यबळच नसल्याने या दोन्ही जागेवर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
रोजच्या आयुष्यात ताणतणावामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र त्या तुलनेत मानसोपचार तज्ज्ञाची संख्या फारच कमी आहे. जवळपास तीन लाख लोकांमागे एक मानसोपचार तज्ज्ञ आहे. यामुळे सर्वच मेडिकल कॉलेजमध्ये मनोविकृतीशास्त्र वियषात ‘एमडी’ मानसोपचार अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर ‘एमडी सायकॅट्रिक’च्या दोन जागेसाठी चंद्रपूर मेडिकल कॉलेजला ‘एनएमसी’कडून १८ ऑगस्ट २०२२ रोजी मंजुरी देण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार चंद्रपूर मेडिकल प्रशासनाने मनोविकृतीशास्त्र विभागात प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी व कनिष्ठ निवासी आदी रिक्त भरणे गरजेचे होते; परंतु दोन महिने उलटूनही रिक्त पदे कायम आहेत.
- नागपूर मेडिकल करू शकते मदत
नागपूर मेडिकलच्या मनोविकृतीशास्त्र विभागात एक प्राध्यापक कार्यरत असून, एका सहयोगी प्राध्यापकाला नुकतीच लोकसेवा आयोगातून प्राध्यापक म्हणून बढती मिळाली आहे; परंतु या संदर्भातील कागदपत्रे अद्यापही प्राप्त झालेले नाही. यामुळे नागपूरच्या प्राध्यापकांना चंद्रपूर मेडिकलला पाठविल्यास दोन जागा वाचतील, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- पाच वर्षांपासून विभागाचा विकासही नाही
नागपूर मेडिकलच्या मनोविकृतीशास्त्र विभागाचाही विकास खुंटलेला आहे. विभागाचा वॉर्डातील बेडची संख्या ४० असतानाही १० ते १२ वर रुग्ण दाखल केले जात नाहीत. रुग्ण कमी होण्याचे कारण डॉक्टरांची कमतरता नसून विभागाची अंतर्गत बाब असल्याचे बोलले जात आहे.
- व्यसनमुक्ती उपचार केंद्रातील साहित्य खरेदीत अनियमितता
नागपूर मेडिकलच्या मनोविकृतीशास्त्र विभागात व्यसनमुक्ती उपचार केंद्र चालवले जाते. या केंद्राला राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत एम्स दिल्लीकडून दरवर्षी निधी मिळतो; परंतु केंद्राकडून मिळालेला निधी व साहित्य खरेदीतील अनियमितता चव्हाट्यावर आली आहे. याची चौकशी होण्याची मागणी होत आहे.
- रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा सुरू
‘एमडी सायकॅट्रिक’चा दोन जागेला मंजुरी मिळाली आहे; परंतु या विषयातील रिक्त जागा भरण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठविला असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. तात्पुरत्या स्वरुपात लवकरच इतर मेडिकल कॉलेजमधून प्राध्यापक उपलब्ध होतील, ही अपेक्षा आहे.
- डॉ. अशोक नितनवरे, अधिष्ठाता मेडिकल चंद्रपूर