नागपूर : दुर्मिळ रक्तगट म्हणून ‘बॉम्बे’रक्तगटाकडे पाहिले जात असताना नागपुरात ‘पॅराबॉम्बे’ रक्तगट असलेल्या दोन व्यक्ती आढळून आल्या आहेत. नागपुरात या रक्तगटाची ही पहिलीच नोंद असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आढळून आलेल्या दोन्ही व्यक्ती ‘पॅराबॉम्बे ओ पॉझिटिव्ह’ रक्तगटाच्या असून, हा दुर्मिळातील दुर्मिळ रक्तगट आहे. (Two rare blood group 'Parabombe O Positive' found for the first time in Nagpur)
अचानकपणे जिवावर संकट येऊन रक्ताची गरज कोणाला, कधी व कुठे पडेल, हे सांगता येत नाही. यामुळे कोरोना काळात कमी झालेले रक्तदान शिबिरांनी आता पुन्हा वेग घेतला आहे. असेच एक शिबिर डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने आठ रस्ता चौक येथे आयोजित करण्यात आले होते. यात एक व्यक्ती रक्तदानासाठी आली असताना त्यांनी आपल्या मुलाचा रक्तगट दुर्मिळ असल्याचे सांगितले. रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा सोनी यांनी याची दखल घेतली. त्या वडिलांसोबत त्यांच्या मुलाचा रक्ताचा नमुना घेऊन तपासले असता ‘पॅराबॉम्बे’ रक्तगट असल्याचे आढळून आले. त्यांनी या रक्तगटावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोघांचे रक्तनमुन्यांसह लाळीचे नमुने मुंबईतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटोलॉजी’कडे (एनआयएच) पाठविले. त्यात ‘पॅराबॉम्बे’ रक्तगट असल्याचे निष्पन्न झाले.
-या रक्तगटाच्या व्यक्तींना दिला जातो ‘बॉम्बे’ रक्तगट
डॉ. सोनी यांनी यांनी सांगितले, रक्ताच्या निर्मितीसाठी शरीरातील ‘एच अँटिजेन’ची गरज असते. जनुकीय रचनेत काही कारणांमुळे ‘म्युटेशन’ म्हणजे बदल झाल्यास ‘एच अँटिजन’ तयार न होता त्याच्या विरोधात अँटिबॉडीज तयार होतात. यामुळे यांच्या सर्वसाधारण रक्तगट चाचण्यांमधून हा रक्तगट ‘ओ’ दिसून येतो. ‘पॅराबॉम्बे’ रक्तगटाच्या व्यक्तीमध्ये ‘एच अँटिजेन’ किंवा ‘एच अँटिबॉडीज’ न बनता थोड्याफार प्रमाणात ‘एच अँटिजेन’ व ‘अँटिबॉडीज’ राहून जातात. बॉम्बे रक्तगटातील व्यक्तीचा लाळेत अँटिबॉडीजमध्ये दिसून येत नाही. या उलट पॅराबॉम्बे रक्तगटाच्या लाळेत अँटिबॉडीज दिसून येतात. या रक्तगटाच्या व्यक्तींना रक्त देण्याची गरज पडल्यास ‘बॉम्बे’ रक्तगट दिला जातो.
बॉम्बे रक्तगटाच्या १५ व्यक्तींमध्ये एक पॅराबॉम्बे रक्तगटाचा व्यक्ती
दुर्मिळ रक्तगटाची नोंद ही वेगळ्या डिरेक्टरीमध्ये केली जाते. त्यानुसार मुंबईमध्ये बॉम्बे रक्तगटाच्या जवळपास ६०० व्यक्ती आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या रक्तगटाच्या अधिक व्यक्ती आढळून येतात. साधारण १० हजार व्यक्तींमध्ये बॉम्बे रक्तगटाचा एक व्यक्त दिसून येतो, तर बॉम्बे रक्तगटाच्या १५ व्यक्तींमध्ये सुमारे एक व्यक्ती ही पॅराबॉम्बे रक्तगटाची आढळून येते. म्हणून हा रक्तगट दुर्मिळातील दुर्मिळ आहे. सध्यातरी नागपुरात या रक्तगटाच्या एकाही व्यक्तीची नोंद नाही, असेही डॉ. सोनी म्हणाल्या.