नागपूर : कापसी-बीडगाव रोडवरील नागेश्वरनगरातील दोन सॉ मिलला लागलेल्या आगीमध्ये साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन पथकाला आग नियंत्रणात आणण्यास दोन तास लागले. आग नेमकी कशाने लागली ते स्पष्ट झाले नाही.
सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास आग लागली होती. आगीची भीषणता लक्षात घेता, अग्निशमन विभागाने कळमना, लकडगंज, सुगतनगर, गंजीपेठ, सक्करदरा, कॉटन मार्केट या फायर स्टेशन येथून सात गाड्या आग विझविण्यासाठी पाठविल्या होत्या. दोन्ही सॉ मिलमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड होते. त्यामुळे आग चांगलीच भडकली होती. त्यामुळे अग्निशमन पथकाला आग विझविण्यास दोन तासाहून अधिक वेळ लागला. आग नेमकी कशाने लागली, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
कळमन्याचे स्टेशन ऑफिसर ज्ञानेश्वर मोहतुरे यांच्या नेतृत्वात तुलसी वैद्य, भुवनेश्वर बरबटे, डी. डी. डोंगे, रवींद्र मरस्कोल्हे यांच्यासह ३० कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. दरम्यान सॉ मिलमध्ये आग लागण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही दुकान, गोडाऊन आदी ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.