नागपूर : उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दादर काजीपेट आणि काजीपेट दादर या दोन विशेष रेल्वेगाड्यांची मुदत वाढविली आहे. या गाड्या आता २५ जून २०२३ पर्यंत धावणार आहेत.
उन्हाळ्यात लग्नसराई आणि वेगवेगळ्या कारणामुळे रेल्वेत अचानक प्रवाशांची गर्दी वाढते. शाळा-महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळेसुद्धा अनेक जण बाहेरगावी जाण्याचा बेत आखतात आणि सर्वांत आरामशीर तसेच परवडेल असे तिकीट दर असल्याने प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. अधिक गर्दी असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. ते लक्षात घेता रेल्वे प्रशासनाला दरवर्षी अतिरिक्त रेल्वेगाड्यांची व्यवस्था करावी लागते. या पार्श्वभूमीवर, आतापासूनच रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार, ०७१९८ दादर-काजीपेट स्पेशल ही रेल्वेगाडी २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालविली जाणार होती. ती आता २५ जून २०२३ पर्यंत चालविली जाणार आहे, तर २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंतची मुदत असलेली काजीपेट दादर स्पेशल आता २४ जून २०२३ पर्यंत चालविली जाणार आहे. या दोन्ही रेल्वेगाड्यांची वेळ, डब्यांची रचना आणि थांबे हे सर्व पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. त्यात कसलाही बदल करण्यात आला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने एका पत्रकातून स्पष्ट केले आहे.