दयानंद पाईकराव, नागपूर : तेलंगणात जाण्यासाठी कॅब बुक करून कॅब चालकाला दारू पाजून ७.५० लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार पळविणाऱ्या दोन आरोपींना गुन्हेशाखेच्या युनिट ३ ने तेलंगणा, आंध्रप्रदेशात शोध घेऊन अटक केली आहे.
कानाकुर्ती पुर्णा चंद्राराव केसवय्या (३७, रा. होम्सकेप्स रिंग व्युह अपार्टमेंट, केव्हीआर वल्ली रोड, दुडीगल, सायबराबाद तेलंगणा) आणि पुष्परेड्डी कार्तीक पुष्परेड्डी सारकेश्वरराव (३०, रा. बोलाराम, हैद्राबाद, तेलंगना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राहुल राजेश शर्मा (२४, रा. सुंदरनगर पारडी) असे कॅब चालकाचे नाव आहे. ते ओला कॅब स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम. एच. ४९, बी. झेड-१४२१ चालवितात.
आरोपींनी त्यांची कॅब तेलंगाना येथे जाण्यासाठी १९ जानेवारी २०२४ रोजी बुक केली होती. राहुल आणि दोन्ही आरोपींनी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संग्राम बारमध्ये दारु पिली. राहुलला जास्त दारु झाल्यामुळे आरोपींनी संगणमत करून कॅबमधील मोबाईल आणि कॅब पळवून नेली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तांत्रीक तपास करून सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा दोन राज्यात पाठलाग केला. त्यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून ७.५० लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने केली.