नागपूर : पाटनकर चौकातील शासकीय मुलांच्या निरीक्षणगृहातून बुधवारी पळून गेलेल्या तीन बालकांनी शहरात दोन ठिकाणी चोऱ्या केल्या. यातील एका बालकाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने ताब्यात घेऊन ५१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाटनकर चौकात असलेल्या शासकीय मुलांच्या निरीक्षणगृहातून बुधवारी दुपारी १.३० वाजता तीन विधीसंघर्षग्रस्त बालक पाणी पिण्याच्या बहाण्याने किचन रुमच्या मागील दाराचे कुलुप तोडून पळून गेले होते. त्यांना अज्ञात आरोपीने फुस लाऊन पळवून नेल्याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी ३६३ नुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान पळून गेल्यानंतर या बालकांनी धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत योगिता सुधाकर काशीकर (३७, रा. अजनी रेल्वे क्वार्टर) या महिलेची दुचाकी चोरी केली. त्यानंतर ईमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुलीला रुग्णालयात नेत असलेल्या प्रिया हेमंत घुमे (३४, रा. वरोरा जि. चंद्रपूर) यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला होता. बॅगमध्ये दोन मोबाईल व रोख १ हजार असा एकुण १८ हजारांचा मुद्देमाल होता. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे अधिकारी व अंमलदारांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने आपल्या दोन विधीसंघर्षग्रस्त साथीदारांसह चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली दुचाकी, रोख ७६०, एक लोखंडी चाकु किंमत ३०० रुपये असा एकुण ५१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विधीसंघर्षग्रस्त बालकासा मुद्देमालासह कपिलनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.