नागपूर : मोमिनपुरा येथील लॉजमध्ये राहून रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे लॅपटॉप, मोबाइल तसेच महागडे साहित्य चोरी करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने गजाआड करून १ लाख ५३ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाविन्य दिलीप चिमुरकर (२७, रा.माता रेणुका चौक,चंद्रपूर) या प्रवाशाचा लॅपटॉप किंमत ४३५०८ रुपये दुरंतो एक्स्प्रेसमधून चोरी झाला होता. त्याने याबाबत लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली होती. तर प्रशांत आनंद राखुंडे (३२, रा. देडगाव, अहमदनगर) या प्रवाशाचा लॅपटॉप, रोख २५०० आणि महत्त्वाचे कागदपत्र असा एकूण ८५५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. रेल्वे सुरक्षा दलाने या दोन्ही प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन संशयित आरोपी दिसले. त्यांना पकडण्यासाठी आरपीएफने वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या निर्देशानुसार आरपीएफचे निरीक्षक आर.एल.मीना यांनी एक टीम गठीत केली.
टीमच्या सदस्यांना दोन्ही आरोपी आरक्षण कार्यालयात संशयास्पद स्थितीत आढळले. त्यांना अटक केली असता त्यांनी आपले नाव जावीर बुंन्दू अहमद (४०,रा.ग्राम कलामपूर,उत्तरप्रदेश) आणि मोहम्मद तैय्यब मोहम्मद हासीम (५७, रा. गोकलपूर,दिल्ली) असे सांगितले. आपण मोमिनपुरातील एका लॉजवर राहत असून रेल्वेस्थानकावर चोऱ्या करीत असल्याची कबुली त्यांनी दिली. दोन्ही आरोपींकडून १ लाख ५३ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
‘जीआरपी’चे काम केले ‘आरपीएफ’ने
रेल्वे संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाची (आरपीएफ) आहे. तसेच रेल्वेस्थानक आणि परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांची आहे. परंतू प्रवाशांचे महागडे साहित्य चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून आरपीएफने लोहमार्ग पोलिसांचे काम केले आहे. या कामगिरीसाठी आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी आरपीएफ जवानांचे कौतुक केले आहे.