पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप : बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी कॅशलेसची सक्ती नागपूर : उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काळा पैसा वापरता यावा, यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर दोन हजाराची नोट चलनात आणल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केला. काँग्रेसच्या रिझर्व्ह बँकेला घेराव आंदोलनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशातील काळा पैसा, दशहतवाद व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरला केला होता. त्यांच्या या निर्णयाला संपूर्ण देशाचा पाठिंबा होता. परंतु यातील एकही हेतू साध्य होताना दिसत नसल्याने आता मूळ हेतू सोडून कॅशलेस व्यवहार सुरू केला आहे. कोणत्याही देशात १०० टक्के कॅशलेस व्यवहार होत नाही. आपल्या देशात या व्यवहाराची सक्ती केली जात आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना कमिशन मिळावे यासाठी ही सक्ती असल्याची टीका चव्हाण यांनी केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पंतप्रधानांच्या दबावाखाली नोटाबंदीचा निर्णय घेऊन बँकेची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. त्यामुळे पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच रिझर्व्ह बँकेपुढे शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अचानक कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. या घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.(प्रतिनिधी)
निवडणुकीसाठीच दोन हजाराची नोट
By admin | Published: January 19, 2017 2:44 AM