युवकांची संख्या अधिक : ३०० जणांना श्रामणेर नागपूूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित धम्मदीक्षा सोहळ््यात मंगळवारी दोन हजारांवर नागरिकांनी भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तर ३०० जणांनी श्रामनेर म्हणून दीक्षा घेतली. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दरवर्षी हजारो भाविक दीक्षाभूमीवर येतात. देशभरातून आलेले असंख्य बांधव बौद्ध धम्मात प्रवेश करतात. मंगळवारी सकाळी ९ पासून धम्मदीक्षा सोहळ््याला सुरुवात झाली. भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई, भंते नागघोष, भंते नागप्रकाश, भंते धम्मबोधी यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दीक्षा घेणाऱ्यांमध्ये २० ते ३० वयोगटातील युवकांची संख्या मोठी असल्याची माहिती वज्रासन स्टडी सेंटरचे वासु बौद्ध यांनी दिली. याच सोहळ््यात ३०० जणांनी श्रामनेर म्हणून दीक्षा घेतली. कोणी तीन दिवस तर कोणी आजन्म भंते म्हणून दीक्षा घेतली. वज्रासन स्टडी सेंटरच्या वासु बौद्ध, वनिता रामटेके, दीपक मुनघाटे, रोहन राऊत, दीपाली सपकाळ, बसवंत सिताफुले, अनुप नागदेवे, भीमराव शंभरकर, विशाल गुरचड यांनी दीक्षा घेणाऱ्यांची नोंद केली. दीक्षा घेतल्यानंतर धर्मांतरित झालेल्या बांधवांना धम्मदीक्षा घेतल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उद्या बुधवारी दिवसभर धम्मदीक्षा देण्याचा कार्यक्रम सुरू राहणार आहे.(प्रतिनिधी)डोळे मिटण्यापूर्वी गाठली दीक्षाभूमीपुण्यातील रामनगर येथील रहिवासी रामभाऊ लांडगे हे ७० वर्षाचे ज्येष्ठ नागरिक दीक्षाभूमीवर आले होते. त्यांना दमा, रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांची प्रकृतीही अलीकडच्या काळात बरी राहत नाही. खूप वर्षांपूर्वी ते एकदा दीक्षाभूमीला आले होते. तेव्हापासून पुन्हा एकदा धम्मदीक्षा सोहळा पाहण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. प्रकृती साथ देत नसल्यामुळे डोळे मिटण्यापूर्वी एकदा तरी दीक्षाभूमीला येण्याचे त्यांनी ठरवून दीक्षाभूमी गाठली. भगवान बुद्धाची इच्छा झाली आणि पुढील वर्षापर्यंत प्रकृती चांगली राहिल्यास पुन्हा दीक्षाभूमीवर येण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
दोन हजारावर नागरिकांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा
By admin | Published: October 21, 2015 3:27 AM