नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पावनी एकसंघ बफर क्षेत्रात भ्रमंती करत असलेले वाघाचे दाेन शावक मृतावस्थेत आढळले आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मानक नियमानुसार त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ व २८ ऑगस्टच्या रात्री एक महिन्याचे वाघाचे दोन शावक कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसले. २९ ऑगस्टला सकाळी ते पुन्हा खापा संरक्षण कुटीजवळ दिसले. परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आणि शावकांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके तयार करण्यात आली. ३१ ऑगस्ट राेजी शेजारील कक्ष क्रमांक २५५ आणि मायक्रो पहाडी परिसरात एका शावकासह वाघिणीच्या पाऊलखुणा आढळल्या. २ सप्टेंबर रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये आणखी एक वाघीण टी-२४ आढळली. मात्र, रविवारी निरीक्षण पथकाला कक्ष क्रमांक २५५ मध्ये दोन शावक मृतावस्थेत आढळले.
वाघिणीचे पगमार्कदेखील मृतदेहांजवळ आढळले. याच परिसरात ३ सप्टेंबर रोजी आणखी एक वाघीण आणि बिबट्याचा पगमार्क नोंदविला गेला. या परिसरात एक नर वाघही आहे. प्रभारी क्षेत्र संचालक व उपसंचालक प्रभूनाथ शुक्ल व इतर संबंधित वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शक सूचनांनुसार परिसराची नाकेबंदी करण्यात आली आणि सर्व प्रकारचे पुरावे शोधण्यासाठी परिसराची झडती घेण्यात आली.
एनटीसीएचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अजिंक्य भाटकर मानद वन्यजीव रक्षक नागपूर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मंदार पिंगळे, सातपुडा फाउंडेशन, वाघोली (सिल्लारी) गावचे पोलिस पाटील रवी उईके, सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे, गोरेवाडाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर पावशे आणि डॉ. सुजित कोलंगथ यांनी शवविच्छेदन केले आणि पुढील तपासणीसाठी व्हिसरल नमुना घेतला. शावकांच्या शरीराचे कोणतेही अवयव गायब नव्हते. मृत्यूचे कोणतेही संशयास्पद कारण नोंदविले गेले नाही.