लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : वेगात असलेल्या दाेन माेटरसायकलींची आपसात जाेरात धडक झाली. त्यात एका दुचाकीचालकाचा डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या माेटरसायकलवरील दाेघे गंभीर जखमी झाले. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद-भिवापूर मार्गावरील नांद नजीकच्या पांजरेपार शिवारातील वळणावर शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
महादेव चौरे (५५, रा. झमकोली, ता. भिवापूर) असे मृताचे, तर सुनील घनश्याम शेंडे (३५) व प्रदीप घनश्याम शेंडे (४०, दोघेही रा. चिखलापार, ता. भिवापूर) अशी जखमी भावांची नावे आहेत. महादेव चाैरे यांनी नांद (ता. भिवापूर) येथून किराणा साहित्य खरेदी केले आणि ते घेऊन एमएच-३१/क्यू ९९८ क्रमांकाची मोटरसायकलने नांदहून झमकाेलीला जायला निघाले. ते पांजरेपार फाटा परिसरातील पुलावरील वळणावर पाेहाेचताच एम-४०/क्यू-९९०५ क्रमांकाच्या माेटरसायकलने चिखलापारहून नांदला येत असलेल्या सुनील व प्रदीप यांची माेटरसायकल महादेव यांच्या माेटरसायकलवर धडकली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. मात्र, महादेव यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि महादेव यांचा मृतदेह भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाेन्ही जखमींना नांद येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर दाेघांनाही नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास बीट जमादार प्रकाश आलाम करीत आहेत.
....
फूटरेस डाेक्यात शिरले
अपघातात दाेन्ही माेटरसायकलींचा अक्षरश: चुराडा झाला. त्यावरून वाहनांचा वेग आणि धडकेची तीव्रता लक्षात येते. यात महादेव यांच्या डाेक्यात माेटरसायकलचा फूटरेस शिरल्याने त्यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. वाहन एकमेकांवर आदळल्याने झालेल्या आवाजामुळे परिसरातील शेतात काम करणारे शेतकरी व मजुरांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. पांजरेपार शिवारातील पुलावर असलेल्या वळणावर विरुद्ध दिशेने येणारे वाहन व्यवस्थित दिसत नसल्याने हे ठिकाण अपघात प्रवणस्थळ बनत चालले आहे.