नागपूर : रविनगर परिसरात एका खासगी रुग्णालयासमोर दुचाकी लावलेल्या व्यक्तीची दुचाकी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता अज्ञात आरोपीने चोरी केली. दरम्यान, त्याने दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून एकाच दिवसात दुचाकी चोराचा छडा लावून चोरी केलेली दुचाकी जप्त केली आहे.
मुकेश फुलचंद शरणागते (वय ३२, रा. दाभा, प्लॉट नं. ५०, गणेशनगर) हे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता रविनगर चौकातील एका खासगी रुग्णालयात आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी आपली हीरो स्प्लेंडर दुचाकी (एम. एच. ४९, ए. डब्ल्यू-६९३५) रुग्णालयासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता ते रुग्णालयाच्या बाहेर आले असता त्यांना आपली दुचाकी जागेवर दिसली नाही. दुचाकी चोरीला गेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार दिली. अंबाझरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती घेतली असता त्यांना आरोपी मुकुंद किसन चौरे (वय ४०, रा. भाग्यश्री ले आऊट, त्रिमूर्तीनगर) याने दुचाकी चोरी केल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजता आरोपीला दुचाकीसह अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरीचे निरीक्षक डॉ. अशोक बागुल, सहायक पोलीस निरीक्षक अचल कपूर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक अवचट आणि पथकाने पार पाडली.
...........