नागपूर : धुतलेले कपडे वाळवण्यासाठी तारेवर टाकत असताना धाकट्या जाऊला जाेरात विजेचा धक्का लागला. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकायला येताच थाेरली जाऊ तिच्या मदतीला धावली. यात दाेन्ही सख्ख्या जावांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर शहरात मंगळवारी (दि. ५) दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
अलका निरंजन विरूळकर (४२) व मंजू पुरुषोत्तम विरूळकर (५५, रा. वाॅर्ड क्रमांक ७, दुर्गा मंदिराजवळ, कळमेश्वर) अशी मृतांची नावे आहेत. संयुक्त कुटुंब असल्याने त्या दाेघीही एकाच घरी राहायच्या. अलका यांनी दुपारी घरातील सदस्यांचे कपडे धुतले आणि नेहमीप्रमाणे अंगणातील तारेवर वाळत टाकण्यासाठी गेल्या. त्या तारेत वीज प्रवाह प्रवाहित असल्याची घरातील कुणालाही जाणीव नव्हती. तारेवर कपडे टाकताक्षणी तारेला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जाेरात धक्का लागला. त्यामुळे त्या ओरडल्या.
अलका यांचा आवाज ऐकायला आल्याने मंजू बाहेर आल्या आणि त्यांनी अलका यांना तारेपासून बाजुला करण्यासाठी स्पर्श केला. त्यामुळे त्यांनाही विजेचा धक्का लागला. दाेघीही बराच वेळ तशाच पडून राहिल्या. काही वेळाने हा प्रकार शेजारी राहणाऱ्या महिलेच्या लक्षात आल्याने तिने इतरांना बाेलावले. शेजाऱ्यांनी दाेघींनाही तारेपासून काळजीपूर्वक बाजूला केले आणि शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी दाेघींनाही मृत घाेषित केले.
माहिती मिळताच ठाणेदार आसिफ रजा शेख, महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता होनाडे, सहाय्यक अभियंता मनोज पुरी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले व पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
दाेन महिन्यांपूर्वी पतीचा मृत्यू
या दाेन्ही महिलांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अलका यांचे पती निरंजन यांचा २८ जुलै राेजी विहिरीत पडून मृत्यू झाला. दाेघींनाही प्रत्येकी दाेन मुले आहेत. अलका यांची दाेन्ही मुले लहान, तर मंजू यांची मुले माेठी आहेत. दाेघींच्या अपघाती मृत्यूमुळे घरात महिलांपैकी कुणीही राहिले नाही. मंजू यांचे पती पुरुषाेत्तम व त्यांची मुले मिळेल ते काम करून उपजीविका करतात.
कटलेल्या वायरला तारेचा स्पर्श
बाथरूममधील लाईटसाठी घरातून वायर नेला आहे. त्याच वायरजवळ कपडे वाळवण्याची लाेखंडी तार आहे. ज्या ठिकाणी वायर व तारेचा एकमेकांना स्पर्श हाेताे, त्याच ठिकाणी वायरचे आवरण थाेडे निघाले असल्याने लाेखंडी तारेत वीजप्रवाह प्रवाहित झाला हाेता. मात्र, वायरला स्पर्श झाल्याने दाेघींनाही विजेचा धक्का लागल्याची नाेंद पाेलीस दरबारी आहे.