नागपूर : जागतिक महिला दिनी कर्तुत्वान महिलांच्या कार्याचा आणि त्यांचा समाजातील योगदानाचा गौरव केला जात असताना दुसरीकडे उपचारादरम्यान ‘ब्रेन डेड’ झालेल्या दोन महिलांच्या कुटुंबियांनी त्यांना अवयरूपी जीवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. या समर्पित कतृत्वामुळे अवयव निकामी होऊन मृत्यूच्या दाढेत जगणाऱ्या चार जणांना अवयव दान मिळाल्याने नवे आयुष्य मिळाले. शिवाय,चार अंधांना दृष्टी मिळणार आहे.
अवयवदान करणाऱ्या दोन महिलांचे नाव शशिकला गुलाबराव वासनिक (६७) रा. इंदोरा नागपूर व संस्कृती धीरज नेवारे (२०) रा. गुहीखेड अमरावती असे आहे.
संस्कृती ही व्यवसाय शिक्षणाच्या प्रथम वर्षाला होती. प्राप्त माहितीनुसार, ती मागील काही वर्षांपासून आजारी रहायची. दोन दिवसांपूर्वी अचानक तिची प्रकृती गंभीर झाली. तिला नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. तपासणी दरम्यान ‘क्रॉनिक आयटीपी’ आणि ‘इंट्रा क्रॅनियल ब्लीड’ झाल्याचे निदान झाले. दोन दिवसाच्या उपचारानंतर तिची आणखी प्रकृती खालवली.
उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे पाहत ‘एम्स’च्या डॉक्टरांच्या एका पथकाने तिची तपासणी केली. त्यांनी ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत झाल्याची घोषणा केली. डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना अयवदानासाठी समुपदेशन केले. तिचे वडील धीरज नेवारे (४८) यांनी त्या दु:खातही अवयवदानाला संमती दिली. याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. त्यांच्यानुसार दोन्ही किडनी व बुबुळाचे दान करण्यात आले. एक किडनी ‘एम्स’मध्ये उपचाराखाली असलेल्या २५ वर्षीय पुरुषाला तर दुसरी किडनी किम्स किंग्जवे हॉस्पिटलमधील ४९ वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात आली. दोन्ही बुबूळ ‘एम्स’च्या नेत्रपेढीला दान करण्यात आले. अवयवदानासाठी ‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. सुचेता मेश्राम, डॉ. अलोक उमरेडकर व डॉ. रोझी के व अशोक सिंग यांनी सहकार्य केले.
आईच्या अयवदानासाठी मुलाचा पुढाकार
शशिकला वासनिक या गृहिणी होत्या. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांची प्रकृती खालवली. त्यांना विवेका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते. परंतु त्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांची प्रकृती न्यूरोलॉजिकलदृष्ट्या खालवली. डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची तपासणी केल्यावर ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यांचा मुलगा विरेंद्र वासनिक (४०) यांना अवयवदानाची माहिती होती. त्या दु:खातही त्यांनी स्वत:हून आईच्या अवयवदानासाठी पुढाकार घेतला. याची माहिती ‘झेडटीसीसी’ला देण्यात आली. अवयवदानाची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन किडनी, यकृत आणि बुबुळाचे दान करण्यात आले. एक किडनी किम्स किंग्जवे हॉस्पिटलमधील ४७ वर्षीय महिलेला देण्यात आली. दुसरी किडनी वैद्यकीयदृष्ट्या योग्य नसल्याने दान झाले नाही. यकृत न्यू इरा हॉस्पिटलमधील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आले. दोन्ही बुबुळाचे दान मेडिकलच्या नेत्रपेढीला करण्यात आले.