नागपूर : जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध दोन महिला आरोपींनी दाखल केलेले फौजदारी अपील उच्च न्यायालयाचे न्या. ए. बी. चौधरी आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी स्वीकारून त्यांना जामीन मंजूर केला. न्यायालयात आरोपींच्यावतीने अॅड. राजेंद्र डागा यांनी काम पाहिले. लीलाबाई बाबूराव थोरात रा. नेरपिंगळई आणि आम्रपाली गोपाल वरघट रा. केकतपूर, अशी आरोपी महिलांची नावे आहेत. या दोघीही मायलेकी आहेत. लीलाबाईने आपली मुलगी आम्रपाली हिचा विवाह अमरावती जिल्ह्याच्या केकतपूर येथील गोपाल वरघट याच्यासोबत करून दिला होता. काही दिवसानंतर गोपाल याला सासरच्या लोकांनी उसने पैसे दिले होते.परंतु तो पैसे परत करीत नव्हता. १२ नोव्हेंबर २०१० रोजी तो आपली पत्नी आम्रपाली हिला सोबत घेऊन नेरपिंगळई येथे गेला होता. लीलाबाई, आम्रपाली या दोघींनी गोपालचा गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेह घरामागील एका खड्ड्यात पुरला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना लीलाबाईचा अल्पवयीन मुलगा आणि पती बाबूराव यांनी मदत केली होती. मुलगा घरी परतला नाही म्हणून गोपालची आई लक्ष्मीबाई वरघट हिने २९ नोव्हेंबर २०१० रोजी शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.तपासात हा खून उजेडात आला होता. त्यामुळे चार आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०२, २०१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमरावती सत्र न्यायालयाने या दोन्ही महिलांना जन्मठेप तर बाबूराव याला ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध त्यांनी अपील दाखल केले. (प्रतिनिधी)
जन्मठेप झालेल्या दोन महिलांना जामीन
By admin | Published: April 20, 2015 2:12 AM