लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कन्हान) : वेगात जाणाऱ्या रेल्वेगाडीने रुळावर काम करणाऱ्या दोन कामगारांना धडक दिली. त्यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांगनेर शिवारात हावडा - मुंबई रेल्वेमार्गावर गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे घटनास्थळी काहिसा तणाव निर्माण झाला होता.रवींद्र मांगोजी येळणे (३५, रा. तारसा, ता. मौदा) व शालिकराम वैजनाथ विश्वकर्मा (४९, रा. वीरसी, ता. मौदा) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हावडा - मुंबई रेल्वे मार्गाचे काम सुरू असून, दोघेही कंत्राटदाराच्या अखत्यारीत या रेल्वे मार्गावरील गांगनेर शिवारात काम करीत होते. दरम्यान, दुपारी २ वाजताच्या सुमारास नागपूरच्या दिशेने वेगात जाणाऱ्या पुरी - जोधपूर एक्स्प्रेसने त्या दोघांना धडक दिली.त्यात दोघंचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच नागरिकांची घटनास्थळी गर्दी केली होती. माहिती मिळताच कंत्राटदार सुरेंद्र शेंडे घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी मृतांच्या कुटुंबीयांनी नुकसान भरपाईची मागणी रेटून धरत मृतदेह उचलू देण्यास मनाई केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, रेल्वेचे नागपूर येथील सिनियर सेक्शन इंजिनियर पी. के. वर्मा आणि तारसा (निमखेडा) येथील इंजिनियर ए. के. चटोपाध्याय घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना शांत करीत कंत्राटदाराकडून शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर तणाव निवळला आणि दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.