लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना न्यू नेहरूनगर, हुडकेश्वर भागात उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. देवदर्शन उर्फ बाळू मेश्राम (वय ४५) असे मृताचे तर सूरज विलास बागडे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे.
मेश्राम न्यू नेहरूनगरात राहत असून ते पोल्ट्री फार्मचे मालक होते. तर आरोपी बागडे त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहतो. घराचे काम सुरू असल्याने दोन वर्षांपूर्वी मेश्राम यांनी त्यांच्या टिना आरोपी बागडेच्या घरासमोर ठेवल्या होत्या. त्यावरून आरोपीने मेश्राम यांना शिवीगाळ केली होती. त्याची वृत्ती लक्षात घेत मेश्राम यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. तेव्हापासून आरोपी नेहमीच मेश्राम यांना शिवीगाळ करायचा.
दरम्यान, शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास अशाच प्रकारे आरोपी बागडेने मेश्राम यांना शिवीगाळ केली. ते कळाल्यानंतर वाद वाढू नये म्हणून मेश्राम बागडेच्या घरी समजूत काढण्यासाठी गेले. मात्र, यावेळी आरोपी बागडेने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. डोक्याला गंभीर जखम झाल्याने मेश्राम यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मेश्राम यांचा मृत्यू झाला. सुलोचना देवदर्शन मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वरचे पीएसआय प्रमोद खंदार यांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
आरोपी फरार, पोलिसांची शोधाशोध
हत्येच्या गुन्ह्याची माहिती मिळताच ठाणेदार सार्थक नेहते, पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे यांच्यासह पोलिसांचा ताफा न्यू नेहरूनगरात पोहचला. तोपर्यंत आरोपी बागडे फरार झाला होता. तो बेवारस असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याचा शोध सुरू आहे.