नागपूर : स्वातंत्र्य समरात शहीद झालेल्या सैनिकांचे फोटो बघून आपण २० किंवा ३० आणि जास्तीत जास्त ५० लोकांना ओळखू शकू. गुगलवरही त्यांना शोधले तर १०० पेक्षा जास्त स्वातंत्र्यसैनिक भेटणार नाहीत; पण डायमंडनगर येथे राहणारी २ वर्षे २ महिन्यांची मिथिला तब्बल ११५ स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो बघताच त्यांचे नाव सांगते. मिथिलाची स्मरणशक्ती प्रचंड असल्याने २ वर्षांच्या वयातच या चिमुकलीचे नाव इंडिया बुकमध्ये या रेकॉर्डसाठी नोंदविले आहे. अद्याप शिशु शाळेचेही तोंड न पाहिलेल्या या मुलीच्या स्मरणशक्तींने अवघे विश्व अचंबित झाले आहे.
जगातील १०० हून अधिक देशांची राजधानीसह ओळख मिथिला पीयूष तेलरांधे या चिमुकलीने सध्या २ वर्षे २ महिन्यांत ८४ स्वातंत्र्यसैनिकांना ओळखण्याचा विक्रम केला आहे. तिच्या विक्रमाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही मान्यता दिली असून, नुकताच दिल्लीत तिचा सत्कार करण्यात आला.विक्रम ८४ स्वातंत्र्यसैनिक ओळखण्याचा असला तरी आजच्या तारखेला तिला ११५ स्वातंत्र्यसैनिक, २१ परमवीर चक्र विजेते, जगातील १०० हून अधिक देशांची ओळख व त्यांच्या राजधानी ती सांगू शकते.तसेच हिंदी आणि मराठीत किमान १५ गाणी तिला तोंडपाठ आहेत. मिथिलाचे वडील आरबीआयमध्ये एजीएम आहेत तर आई डॉ. दीप्ती तेलरांधे या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
अशी वाढली स्मरणशक्तीमिथिलाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचे ध्येय तिला मोबाइल फोनपासून दूर ठेवण्याचे होते. हे साध्य करण्यासाठी त्यांनी तिला खेळाच्या स्वरूपात पुस्तके, चित्रे दाखवायला सुरुवात केली. त्याला तिने सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्या-ज्या गोष्टी तिला शिकविल्या त्या सर्व गोष्टी ती आठवत होती. त्यामुळे तिची स्मरणशक्ती विकसित होत गेली.प्रत्येक मूल जन्मतःच प्रतिभा घेऊन येते आणि मुलांना पुरेसा वेळ देऊन त्या प्रतिभेला वाव देणे, हे पालकांचे कर्तव्य आहे. सर्व पालकांनी मुलांच्या नित्यक्रमातून मोबाइल काढून त्यांना पुस्तकांच्या जवळ आणल्यास हा चमत्कार सहज घडू शकतो.