लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : आपल्या विविध समस्या वेळीच साेडविल्या नाही, तर येत्या २ ऑक्टाेबर राेजी कळमेश्वर येथील पंचायत समिती कार्यालयासमाेर एक दिवसाचे लाक्षणिक उपाेषण केले जाईल, असा इशारा ग्राम रोजगार सेवक संघटनेने खंडविकास अधिकारी महेश्वर डोंगरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
राज्य सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेतून ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्यात २००६ पासून एकूण २८,१४४ रोजगारसेवक कार्यरत असून, त्यांना दरमहिन्याला शासनाच्या प्रशासकीय खर्च निधीतून ६ टक्के मानधन दिले जाते.
प्रत्येक पंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायतीमध्ये नव्याने निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांच्या सूडबुद्धीच्या राजकारणाने ग्रामरोजगार सेवकांना खोट्या प्रोसिडिंगद्वारे कामावरून कमी करून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. कुटुंबीयांच्या उदरभरणाची जबाबदारी कुटुंबप्रमुख म्हणून रोजगारसेवकांवर असल्याने त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आकसपूर्ण कारवाईमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवते. त्यामुळे शासनाने ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायतस्तरावर कायम करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जिचकार, उपाध्यक्ष वासुदेव गोतमारे, सचिव आदेश गोतमारे, नंदकिशोर मानकर, गोपाल बंगले, रूपेश निवुल, कृष्णा ढवळे, राहुल चिमोटे, मनोहर निंबाळकर, संजय निमकर, चंद्रशेखर तागडे, भूषण दैने, राहुल गजभिये, विजय पावडे, धीरज अंजनकर, मिलिंद भांगे, प्रशांत खांडेकर, भाऊराव निमकर, मनोज ठाकरे, पुरुषोत्तम जुनघरे, श्रावण टाले, प्रिया रंगारी, रजनी नागपुरे, प्रभाकर पेंदाम, रामेश्वर शेटे, नितेश मांडवगडे, प्रशांत ठवरे, पंकज पराडे, विजय ठाकरे, सूर्यभान टेकाडे यांचा समावेश हाेता.