लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : आर्थिक व्यवहार करताना विश्वासात घेत नसल्याचा आराेप करीत बाेखारा (ता. नागपूर ग्रामीण) ग्रामपंचायतच्या १७ पैकी आठ सदस्यांनी सदस्यपदाचा सामूहिक राजीनामा दिला हाेता. यावर निर्णय घेण्यासाठी आयाेजित केलेल्या मासिक सभेच्या एक दिवस आधीच या सदस्यांनी ‘यू टर्न’ घेत आपापले राजीनामे मागे घेतले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.
सामूहिक राजीनामे देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये वर्षा सहारे, डॉ. सुमित घोंगडे, ईशान कुर्वे, पूनम डवले, अजय बारई, सीमा मानवटकर, सुप्रिया आवळे व शकील अन्वर शेख या आठ सदस्यांचा समावेश हाेता. त्यांनी १५ जुलैला त्यांचे राजीनामे सरपंच अनिता पंडित यांच्याकडे साेपविले हाेते. यावर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (दि. २२) ग्रामपंचायतची विशेष मासिक सभा बाेलावण्यात आली हाेती. मात्र, या आठही सदस्यांनी ‘यू टर्न’ घेत साेमवारी (दि. १९) आपापले राजीनामे मागे घेतले आहेत.
ग्रामपंचायतने पाणीटंचाई संदर्भात केलेल्या खर्चावर संशय व्यक्त करीत या सदस्यांनी राजीनामे दिले हाेते. त्यावर अंतिम निर्णय व्हायचा हाेता. मात्र, आठही सदस्यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याचे वैयक्तिक पत्रही ग्रामपंचायतकडे सादर केले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २०) विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. त्यात सर्व राजीनामे नामंजूर करण्यात आल्याची औचारिकताही पूर्ण करण्यात आली. या बैठकीला पूनम डवले वगळता राजीनामा देणारे अन्य सदस्य हजर हाेते.
...
मतदारांच्या विनंतीमुळे माघार
आपण वाॅर्डाचे लाेकप्रतिनिधी आहाेत. नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास कामे हाेत नसल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामे दिले हाेते. याची माहिती मिळताच मतदारांनी राजीनामे मागे घेऊन पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली. त्यामुळे आपण माघार घेतली, अशी प्रतिक्रिया आठही सदस्यांनी व्यक्त केली. आर्थिक घाेटाळ्यासंदर्भात खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्यांची चाैकशी करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
...
आर्थिक घाेटाळा केल्याचा आराेप निराधार आहे. ग्रामपंचायतचे सर्व व्यवहार व निर्णय नियमानुसार आहेत. असले आराेप करून ग्रामपंचायतला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित व्यक्तींनी आराेप सिद्ध करावे. सामाजिक मानहानी झाल्याने आपण मानहानीचा दावा करणार आहे.
- अनिता पंडित,
सरपंच, बाेखारा.