लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेचे ‘उडान’(देशातील सामान्यांना विमान प्रवास) विमान मंगळवारी मध्यरात्री नागपूर विमानतळावर पहिल्यांदाच वळवून उतरविण्यात आले. जबलपूर येथे खराब हवामानामुळे विमानातील प्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्यात आले.अलायन्स एअरलाईन्सचे (एअर इंडियाची उपकंपनी) रिजनल कनेक्टिव्हिटीचे दिल्ली-जबलपूर ९आय ६१७ विमान मंगळवारी रात्री १०.४७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. हे विमान व्हीटी-आरकेके ७२ सीटांचे आहे. विमानात ५५ प्रवासी होते. दिल्लीहून उड्डाण भरून जबलपूरजवळ पोहोचताच वैमानिकांना हवामान खराब असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नागपूर एटीसीला परवानगी मागितल्यानंतर विमान उतरविण्यात आले. काही वेळानंतर विमानातील १५ प्रवाशांनी जबलपूरला नेण्याची मागणी केली. त्यानंतर विमानतळावर एअर इंडियाचे स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे, विमानतळ व्यवस्थापक श्रीराम पाठक आणि ड्युटी व्यवस्थापक अनिल सोनकुसरे यांनी पाच कारची व्यवस्था करून, या प्रवाशांना जेवणाचे पॅकेट देऊन रवाना केले. तर उर्वरित ४० प्रवाशांना हॉटेलमध्ये थांबविण्यात आले. त्यांनाही बुधवारी सकाळी १२ कारने जबलपूरला पाठविण्यात आले.एफडीटीएलच्या कारणामुळे अडकले विमानप्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्याची व्यवस्था केल्यानंतरही विमान दिल्लीला निघाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान नागपुरात पोहोचल्यानंतर वैमानिकांची फ्लाईट ड्युटी टाइम लिमिट (एफडीटीएल) संपली होती. नियमानुसार दोन लॅण्डिंग आणि टेकआॅफनंतर वैमानिकांना किमान ११ तासांचा विश्राम अनिवार्य आहे. याच कारणामुळे वैमानिकांनाही हॉटेलमध्ये थांबविण्यात आले. विमान १७ तास विमानतळावर थांबल्यानंतर दुपारी ४ वाजता रिक्त दिल्लीला रवाना झाले.दोन विमाने रद्द तर नऊ विमानांना विलंबबुधवारी इंडिगोची दिल्ली आणि कोलकाताहून नागपुरात येणारी दोन विमाने काही कारणांमुळे रद्द करण्यात आली, तर नऊ विमानांना नागपुरात पोहोचण्यास १५ मिनिटे ते पाच तासांपर्यंत उशीर झाला. गो एअरचे जी८ २६०१ मुंबई-नागपूर विमान ५४ मिनिटे उशिराने सकाळी ९.१० वाजता, इंडिगोचे ६ई ४८२ मुंबई-नागपूर विमान ४२ मिनिटे उशिरा सकाळी १०.३७ वाजता, इंडिगोचे ६ई १३४ पुणे-नागपूर विमान १.४८ तास विलंबाने दुपारी २.२८ वाजता, इंडिगोचे ६ई ५३८८ मुंबई-नागपूर विमान १.३० तास उशिरा २.५५ वाजता, इंडिगोचे ६ई ४०३ मुंबई-नागपूर विमानाला तब्बल ४.५५ तास विलंब तर इंडिगोचे ६ई ६६३ कोलकाता-नागपूर विमान २.४० तास विलंबाने आले. पावसामुळे मुंबईतून नागपुरात येणाऱ्या चार विमानांना उशीर झाला.
‘उडान’ विमानाचे प्रवासी रस्तामार्गे जबलपूरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:46 AM
रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेचे ‘उडान’(देशातील सामान्यांना विमान प्रवास) विमान मंगळवारी मध्यरात्री नागपूर विमानतळावर पहिल्यांदाच वळवून उतरविण्यात आले. जबलपूर येथे खराब हवामानामुळे विमानातील प्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्यात आले.
ठळक मुद्दे खराब हवामानामुळे विमान वळविले : विमानतळावर १७ तास विमान उभे