रामटेकचा गड वाचविण्यासाठी कामठीत उद्धवसेनेचे दबावतंत्र! जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले लढणार
By जितेंद्र ढवळे | Published: October 27, 2024 06:51 PM2024-10-27T18:51:37+5:302024-10-27T18:52:20+5:30
उद्धवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारीही जाहीर केली आहे.
जितेंद्र ढवळे,
नागपूर : महाविकास आघाडीत रामटेकची जागा उद्धवसेनेला सुटली आहे. उद्धवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. मात्र, आता रामटेकची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस नेते दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे सांगत उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनीही कामठी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. कामठी महाविकास आघाडीच्या वतीने (काँग्रेस) माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर यांना शनिवारीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
काँग्रेस रामटेकमध्ये बंडखोरी करेल, तर उद्धवसेनेच्या वतीने आपण २९ रोजी कामठी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू, असे गोडबोले यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. उद्धवसेनेकडून बरबटे यांना रामटेकची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, खा. श्यामकुमार बर्वे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई गाठत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत काय ठरले, हे दोन्ही पक्षांकडून अधिकृत जाहीर करण्यात आले नाही. मात्र, रामटेकमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडीमुळे उद्धवसेनेने दबावतंत्राचा अवलंब सुरू केल्याची चर्चा आहे.
चौकसे यांनीही घेतला बंडाचा झेंडा
रामटेकमध्ये काँग्रेसकडून इच्छुक असेलेले पर्यटक मित्र चंद्रपाल चौैकसे यांनीही रामटेकमध्ये बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. चौकसे यांनी त्यांच्या बॅनरवरून शनिवारीच काँग्रेस नेत्यांचे फोटो हटविले होते. त्यांनी मंगळवारी (दि.२९) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले आहे.