नागपूर (रामटेक) : रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांचा विजय झाला. बर्वे यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी वज्रमूठ बांधली होती. मात्र तीन दिवसांपूर्वी रामटेक येथील आभारसभेत माजी जि. प. अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी उत्साहाच्या भरात आता रामटेक विधानसभेत काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. बर्वे यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.
रामटेकच्या गंगाभवन येथे उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. तीत उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभेत रामटेकच्या गडावर भगवा फडकावण्याचा संकल्प केला. आधी काँग्रेसच्या बर्वे आणि आता उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर उमेदवार जाहीर केले असल्याने रामटेकमध्ये महाविकास आघाडी बिघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. बर्वे यांच्या व्यक्तव्यावर जिल्ह्यातील काँग्रेसच्या एकाही वरिष्ठ नेत्याने भाष्य केले नाही. मात्र शनिवारी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी बर्वे यांना रामटेकची उमेदवारी जाहीर करण्याचे अधिकारी कुणी दिले, असा सवाल केला होता.
रामटेक येथील मंथन बैठकीत उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभेत विधानसभाप्रमुख विशाल बरबटे यांच्या विजयासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहनही केले. तसेच गावोगावी जाऊन पक्षाचा प्रचार करण्याचा संकल्प केला. या बैठकीला महाराष्ट्र राज्य संघटक सागर डबरासे, जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबाले व उत्तम कापसे, महिलाप्रमुख दुर्गा कोचे, हेमराज चोखांद्रे, अरुण बन्सोड, मौदा, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.