नागपूर : आगामी निवडणूकांसाठी शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. यावर भाजपेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. संभाजी ब्रिगेडला मागील वेळी ०.०६ टक्के मते मिळाली होती. त्यांच्याशी परत युती करून उद्धव ठाकरे यांनी फुसका बार सोडला आहे, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. शुक्रवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
२०१९ मध्ये संभाजी ब्रिगेडची शिवसेनेसोबत युती होती. त्यावेळी ते ४० जागांवर निवडणुका लढले व त्यांनी ३६ हजाराच्या वर त्यांनी मतं घेतली नाही. त्यांच्या मतांची टक्केवारी ०.०६ टक्के होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरे यांनी फुसका बार सोडला आहे. आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे बावनकुळे म्हणाले. या युतीचा भाजप किंवा सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे ज्या पद्धतीने सरकार चालविले, त्यांना त्याच पद्धतीचे सहकारी भेटतील, असा चिमटादेखील बावनकुळे यांनी काढला.
पंकजा मुंडे अजिबात नाराज नाहीत
दिल्लीत मी ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याशी चर्चेतून मला उर्जा मिळाली. या भेटीचा इतर काहीही उद्देश नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे या कधीच नाराज नव्हत्या व आतादेखील नाराज नाहीत. त्यांच्याबाबत चुकीच्या बातम्या पेरण्यात येतात. त्या राष्ट्रीय सचिव आहेत. महाराष्ट्रातदेखील पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तसेच निवडणूकांत पूर्ण क्षमतेने काम करण्याचे त्यांनी मला आश्वासन दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंचे इव्हेंट मॅनेजमेन्ट बंद होणार
तान्हा पोळा निमित्य आदित्य ठाकरे नागपुरात येत आहेत. खरे तर त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट सुरू आहे. एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या की ते इव्हेंट मॅनेजमेंट व विदर्भाचे दौरेदेखील बंद होतील. जेव्हा जनतेची सेवा करण्याची संधी होती तेव्हा त्यांनी काही केले नाही. तेव्हा ते मंत्रालयातदेखील बसले नाही. जनतेला सत्य कळाले आहे व जनता आता त्यांच्या प्रयत्नांना दाद देणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.