नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही, म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. २०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवले, ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहे. त्यामुळे वैफल्यातून ते गरळ ओकत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केली.
बावनकुळे म्हणाले, सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळले आहेत. त्यांचं डोकं काम करत नाही आहे. पुन्हा सत्तेत येण्याची संधी नाही. पक्ष गेला चिन्ह गेले, राष्ट्रवादी भाजपसोबत आली, पुन्हा कधी सत्तेत येऊ शकत नाही हे दुःख उद्धव ठाकरे यांना आहे. हे दुःख सामनातून मांडून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून चूक केली ती आता यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे ते मुखपत्रातून अशा पद्धतीने टीका करीत आहेत. आमचे मुंबईचे नेते पदाधिकारी या मुखपत्राविरोधात आंदोलनात्मक भूमिका घेऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा ठासून दावा
शिंदेच मुख्यमंत्री राहणार
- विरोधी पक्ष नेते म्हणून काही बोलावे लागते म्हणून विजय वडेट्टीवार बोलतात. २०० च्या वर बहुमत असलेले आमचे सरकार आहे. २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असून त्यांच्याच नेतृत्वात अजित पवार यांना सोबत घेऊन आम्ही निवडणुका लढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक मतदारसंघात ५० हजार घरी भेटी
- भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात घर चलो अभियान राबविणार आहेत. प्रत्येक मतदारसंघातील ५० हजार घरांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. राज्यात ५१ टक्के मतं मिळवणे हे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी आम्ही संघटनात्मक प्रवास करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.