नागपूर : शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. संघ कार्यालयातून ते बाहेर पडले असतील तर सरसंघाचालक भागवतांनी काळजी घ्यावी, कोणत्या कोपऱ्यात लिंबू, टाचण्या पडल्या आहेत का याचा शोध घ्यावा. कारण या मिंधे गटाची नजर बुभुक्षित आहे. यांनी वडील, नेते, पक्ष, कार्यालय चोरले आहे, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरातील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत केला.
शिंदे गटावर सरकारवर खरपूस टीका करताना ठाकरे म्हणाले की, अधिवेशन सुरू झाल्यापासून अनेक घोटाळे बाहेर येत आहे. मात्र, एकाही मंत्र्याचा राजीनामा होत नाही हे आश्चर्य आहे. आरोपींना क्लीन चिट तर आरोप करणाऱ्यांना दोषी ठरविण्याचे षडयंत्र या सरकारने रचले आहे. विदर्भात हे अधिवेशन होत असताना विदर्भाला काय पॅकेज दिले जाते याकडे आमच्या नजरा लागल्या आहे. विदर्भातील उद्योजकांनी काम झाले असेल तर पाहुण्यांनी परत जावे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. या भावनांचे समर्थन करताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. "स्वत:मध्ये काही करण्याची धमक नाही याची कल्पना ज्याला असते, तो चोऱ्यामाऱ्या आणि दुसऱ्याचं ओरबाडण्याचं काम करतो. आज मुख्यमंत्री संघाच्या कार्यालयात गेलेत, मग आता त्या कार्यालयावरही दावा करणार का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
- मंत्र्यांच्या घोट्याबद्दल सरकारने भूमिका जाहीर करावी
विदर्भासाठीच्या ठोस योजना या सरकारकडून अद्याप विदर्भासाठी जाहीर झालेल्या नाहीत. अर्थसंकल्प झाल्यावरच पुरवणी मागण्यांच्या बाबतीत स्पष्टता करावी, एनआयटी घोटाळा, अब्दूल सत्तार, उदय सामंत सगळ्यांच्या घोटाळ्याबद्दल सरकार काय करणार हे जाहीर करावे, उत्तर द्यावे. सरकार शेतकरी, महागाईसारखे विषय बोलत नाही, याकडेही ठाकरेंनी लक्ष वेधले.